वेब न्यूज : फेसबुकला यूजर्सचा गुडबाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>स्पायडरमॅन

केंब्रिज डाटा लीक प्रकरणाचा फार मोठा फटका फेसबुकला बसला आहे. आर्थिक आणि सामाजिक स्तरावरदेखील फेसबुकची या काळात बरीच बदनामी झाली. अजूनही रोज कुठल्या ना कुठल्या विवादात फेसबुकचे नाव सतत समोर येतच असते. आता तर अमेरिकेच्या प्यू सेंटर या सर्व्हे एजन्सीच्या रिपोर्टनुसार कमीत कमी एकचतुर्थांश लोकांनी आपल्या मोबाईलवरून फेसबुकचे ऍप डिलीट केले आहे. तर जगभरामध्येसुद्धा अशीच स्थिती असून मोठ्या प्रमाणावर लोकांनी फेसबुक ऍपच्या माध्यमातून फेसबुक वापरणे बंद तरी केले आहे. अथवा ते ऍप्लिकेशनच डिलीट केले आहे. फेसबुकच्या डाटा लीक प्रकरणाचा लोकांवर अत्यंत नकारात्मक परिणाम झाला असून अनेक लोकांना फेसबुक आपली खासगी माहिती चोरत आहे, आपल्यावर सतत पाळत ठेवून आहे अशी धास्ती वाटल्याचे या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे. लोकांचा फेसबुकवरचा विश्वास उडत चालल्याचे यातून स्पष्ट दिसते आहे.

जगभरातील फेसबुक सोडणार्‍या यूजर्सपैकी 44 टक्के हे 18 ते 29 वयोगटातील आहेत हे विशेष. अमेरिकेतदेखील झालेल्या या सर्व्हेत भाग घेतलेल्या 74 टक्के लोकांनी आपण फेसबुक आणि आपल्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये बदल केल्याचे सांगितले, तर इतरांनी तर आपण गेल्या 10-12 दिवसांत फेसबुक डिलीटच केल्याचे सांगितले.  

आता ऍण्ड्रॉइड फोनसाठीदेखील टॉर ब्राऊझर

सायबर सुरक्षेसाठी प्रसिद्ध असलेल्या टॉर ब्राऊझरला आता ऍण्ड्रॉइड फोनसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. खरे तर हा ब्राऊझर इंटरनेटवर आपली ओळख गुप्त ठेवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरला जातो. या ब्राऊझरच्या माध्यमातून अगदी ‘गुगल’सारख्या कंपन्यादेखील तुम्हाला ट्रक करू शकत नाहीत आणि तुमची प्रायव्हसी पूर्णपणे जपली जाते असा कंपनीचा दावा आहे. हा ब्राऊझर सतत आपले आयपी ऍड्रेस बदलत असल्याने यूजर नक्की कुठल्या ठिकाणावरून ऑनलाइन आहे याचा मागोवा घेणे अशक्य बनते. या ब्राऊझरचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तुम्ही हा बंद केल्यानंतर ह्यातील कुकीज आपोआप डिलीट होतात.