
सामना ऑनलाईन । परभणी
शहरातील आकाशनगर येथील श्री गणेश वेद पाठशाळेत वेदशास्त्रसंपन्न होण्यासाठी शिकणार्या तीन कोवळ्या मुलांवर संस्थाचालकांच्या नात्यातील अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची खळबजनक घटना घडली आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पाठशाळेच्या संचालकास पोलिसांनी गजाआड केले आहे. या अत्याचार केल्याच्या घटनेने ब्राह्मण समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पाठशाळेचे संचालक सुधीर कुलकर्णी आणि अन्य दोघांविरुद्ध परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुलकर्णी यास अटक करण्यात आली आहे.
या वेदशाळेत ज्या तिघांवर लैंगिक अत्याचार झाले त्यांच्या पालकांनी तीनपैकी दोन मुलांना सोबत घेऊन शुक्रवारी परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन अनन्वित अत्याचाराची कहाणी सांगितली. उपाध्याय यांनी लगेच तक्रार दाखल करवून घेण्याचे आदेश दिले. दोन मुलांनी आपबिती सांगितली तेव्हा पोलीस अधिकारी आणि कर्मचारीदेखील चक्रावून गेले. तिसर्या मुलावर अनन्वित लैंगिक छळ झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. अत्याचारग्रस्त मुलांना न्याय मिळावा म्हणून ब्राह्मण समाजातील अनेक वेदशास्त्रसंपन्न व्यक्ती तसेच पुरोहितांनी परभणीच्या पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. दुसरीकडे समाजातील प्रकरण आपसात मिटवा असा दबाव पालकांवर आणण्याचेही समाजातीलच काही व्यक्तींकडून प्रयत्न झाले. त्यासाठी परभणीतील एका दोन बड्या लोकप्रतिनिधीला मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न झाला, पण पालकांनी ते धुडकावून लावत त्या लोकप्रतिनिधींना अक्षरश: पिटाळून लावले.
अत्यंत घृणास्पदरीत्या छळ
मागील काही महिन्यांपासून या मुलांवर लैंगिक अत्याचार सुरू होते. अत्याचार करणारे दोघेही त्याच शाळेतील विद्यार्थी आहेत. मुलांना नग्न करून उलटे टांगणे, पाईपने जबर मारहाण करणे असे घृणास्पद प्रकार केले गेले. या प्रकाराकडे संस्थाचालक कुलकर्णी यांनी डोळेझाक केल्याचे पालकांनी सदरील तक्रारीत म्हटले आहे.



























































