
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे परिसरात बिबट्याचा संचार वाढला असून बुधवारी रात्री भरवस्तीत घराजवळ पाडा मारल्याने ग्रामस्थांमध्ये भिती पसरली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
गेले काही दिवस फणसवणे परिसरात रिक्षा व वाहन चालकांना रात्री आठ ते नऊच्या सुमारास थेट वस्तीनजिक बिबट्याचे दर्शन होत असल्याची चर्चा सुरु होती. बुधवारी सांयकाळपासून परिसरात विजांच्या कडकडासह तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यात दहाच्या सुमारास वीज गेल्याने सर्वत्र अंधार होता. याच अंधाराचा फायदा घेत फणसवणे कपिलनगर येथील शेतकरी अनंत दाजी कदम यांच्या घराला लागुन असणाऱ्या गोठ्यातील दोन पाड्यांपैकी एका पाड्यावर बिबट्याने हल्ला चढवत तेथेच फडशा पाडला.
अनंत व त्याची पत्नी वयोवृध्द असून हल्ला झाला तेंव्हा ते दोघेही घरात होते. बिबट्याने हल्ला केल्याचे दोघांच्याही लक्षात आले पण जवळ घरे नसल्याने मदतीला कोणाला बोलावण्यासारखे नसल्याने ते काहीच करु शकले नाहीत. पावसाळा सुरु होण्यापूर्वी अनंत यांचा एक पाडा त्याच ठिकाणी बिबट्याने मारला होता. तर मे मध्ये अनंत याची पाच मोठी जनावरे अज्ञात रोगाने मेली होती.
एकाच शेतकऱ्यांची पाच जनावरे रोगाने मेली तर दोन होतकरू पाडे बिबट्याने खाल्ल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले असून दिवसेंदिवस या परीसरात बिबट्याचा वाढता संचार पाहून ग्रामस्थांत भीती पसरली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मांगणी होत आहे.





























































