
सामना ऑनलाईन । मुंबई
बीडच्या ललिता साळवेचा सेंट जॉर्जेस रुग्णालयात ललित साळवे झाला. मुलीचा मुलगा झाला. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर देशाच्या कानाकोपऱयातून अशाच लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी सेंट जॉर्जेसचा फोन सतत खणखणतोय. आतापर्यंत 13 मुलामुलींच्या पालकांनी त्यासाठी संपर्क साधला आहे.
ललिता साळवे ही बीड पोलीस दलातील महिला शिपाई. बालपणापासून स्त्राr म्हणून जगत असलेल्या ललिताला वाढत्या वयाबरोबर शरीरातील बदलांची जाणीव होऊ लागली होती. ते बदल पुरुषासारखे होते. ललिता ही स्त्राr नव्हे, तर पुरुषच असल्याचे तिच्या शारीरिक तपासणीतून निष्पन्न झाले. सेंट जॉर्जेस रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर ललिताचा ललित झाला.
सेंट जॉर्जेससारख्या सरकारी रुग्णालयात झालेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेची प्रशंसा देशभरात झाली. खासगी रुग्णालयांमध्ये त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. यानंतर सेंट जॉर्जेस रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेण्यास इच्छुक मंडळींच्या रांगा लागल्या आहेत. आजवर 13 मुलामुलींनी त्यासाठी संपर्क साधला असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्राबाहेरूनही संपर्क
महाराष्ट्रातूनच नव्हे तर राज्याबाहेरूनही अनेक लोकांनी या शस्त्रक्रियेसाठी संपर्क साधला आहे. आसामच्या एका ग्रामीण भागातील 23 वर्षीय तरुणीचे पालकही तिच्यासह येऊन भेटून गेले असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. लिंगबदल शस्त्रक्रियेपूर्वीच्या तपासणीसाठी विशेष ओपीडीही सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.



























































