
>>>विवेक दिगंबर वैद्य
सन 1974 च्या वैशाखात श्रीगुरुचरणी लीन झालेल्या ‘श्री शिवाजी महाराज’ या सत्पुरुषाचा परिचय करून देणारा हा लेख.
कोल्हापूरच्या कसबा-बावडा परिसरातील कवायती मैदानामध्ये सैनिकांसाठी विहीर खणण्याचे काम सुरू होते. मजुरांची लगबग तिथून येणाऱया जाणाऱयांचे लक्ष वेधून घेत होती. चार पुरुष खोल खणल्यावरही पाण्याचा मागमूस लागला नव्हता. प्रयत्नांची पराकाष्ठा अन् शर्थीची मेहनत जमेस धरली तरीही मजुरांच्या हाती यश काही गवसत नव्हते. अखेर थकलेले मजूर खड्डय़ाबाहेर आले. पान-चुना-कात-तंबाखू यांची देवाणघेवाण झाली. अतिश्रमाने दमलेले ते कष्टकरी जीव अंमळ विसावले तोच कुठून तरी एक कृश व्यक्ती तिथे अवतीर्ण झाली. डोक्यावर बोटभर केस, चेहऱयावर संभ्रमित भाव, अंगात सुरकुतलेला सदरा अन् घट्ट आवळून नेसलेले धोतर अशा अवतारातील ती व्यक्ती कसला तरी शोध घेत तिथे आली आणि दगडमातीच्या टेकाडावर बसली. जवळच पडलेले दोन चपटे दगड तिने उचलले आणि त्यांचे ‘टाळ’ करून ती मोठमोठय़ाने ‘‘राधेकृष्ण गोपाळकृष्ण…राधेकृष्ण गोपाळकृष्ण’’ असे म्हणत भजनात दंग झाली.
अवचितपणे आलेल्या त्या व्यक्तीच्या आवाजातील माधुर्य व गोडवा आळसावलेल्या मजुरांना आकर्षित करता झाला. तिथे जमलेल्या प्रत्येकानेच ‘‘राधेकृष्ण गोपाळकृष्ण’’चा गजर करीत फेर धरण्यास सुरुवात केली. त्याच वेळी तिथे काही चाणाक्ष मंडळीही उपस्थित होती. जसजसा गजर वाढता झाला तसतसे विहिरीच्या कोरडय़ाठाक पात्रामध्ये जिवंत झरे प्रकट होत असल्याचे त्यांना जाणवले. दगडाचे टाळ हाती घेत भजनानंदात दंग झालेल्या त्या व्यक्तीचे देहभान हरपले, भजनाचे सूर टिपेला पोहोचले तसा एकाएकी विहिरीच्या पाण्याचा लोंढा उसळून वर आला आणि पाहता पाहता खणलेली विहीर पाण्याने तुडुंब भरून वाहू लागली. भजनात दंग झालेल्या मजुरांना त्यांच्या पायाचे तळवे ओलेशार झाल्याचे जाणवले तेव्हा त्यांना या घडलेल्या अकल्पित प्रकाराचे आकलन झाले.
अपार कष्टाने खणलेल्या विहिरीला एरवी पाणी लागले नसले तरीही अवचितपणे तिथे आलेल्या त्या विक्षिप्त वल्लीच्या हातातील दोन दगडांचे आघात विहिरीला चैतन्याचा स्रोत देते झाले. आजही कसबा-बावडा परिसरातील ती विहीर ‘शिवाजी विहीर’ म्हणून आणि ही किमया करणारा तो विक्षिप्त अवलिया ‘श्री शिवाजी महाराज’ या नावाने ओळखला जातो.
महाराष्ट्राच्या रयतेला ‘स्वराज्य’ आणि ‘सुराज्य’ मिळवून देणारा युगपुरुष सर्वप्रथम ‘श्री शिवाजी महाराज’ या नावाने अवतरला आणि त्यानंतर साधारण 275 वर्षांनी याच महाराष्ट्रातील करवीरनगरी कोल्हापुरास अध्यात्म मार्गाचा परिचय करून देणारा सत्पुरुष ‘श्री शिवाजी महाराज’ नावाने अवतार घेता झाला. या दोन्ही महापुरुषांचा स्थलकाल निराळा असला तरी त्यांचे देव-देश-धर्मावरील प्रेम तितकेच जाज्वल्य आणि प्रखर होते. भक्तिपंथाचा झेंडा उभारलेल्या या आधुनिक श्री शिवाजी महाराज जाधव यांनी धर्मकारण आपलेसे केले.
कोल्हापूर जिह्यातील गारगोटीजवळच्या फणसवाडीतील हणमंतराव आणि जनाबाई जाधव या सत्शील दांपत्याचा संसार पाच मुलांनी बहरलेला होता. आर्थिक परिस्थिती फारशी उत्तम नसली तरी सचोटी आणि नेकीने वागणारे हणमंतराव पत्नी जनाबाईसोबत या पाचही मुलांचा प्रतिपाळ अतिशय निगुतीने व प्रेमाने करीत होते. दत्ताजी, शंकर, कमला, शिवाजी आणि विष्णू या पाच मुलांमधील शिवाजी जन्मजात व्यंग सोबतीला घेत 1 मार्च 1908 या दिवशी जगात प्रवेश करता झाला. हणमंतरावांची श्री शाहू महाराजांच्या पलटणीतील शिपायाची नोकरी शिवाजीच्या जन्मापूर्वीच संपुष्टात आली. धड उठताबसताही न येणारा शिवाजी मातापित्याच्या काळजीचा विषय बनला. दोघांनीही लौकिक व अलौकिक सर्व प्रयत्न करून पाहिले. मात्र तरीही शिवाजीचे शारीरिक व्यंग दिसामासांनी वाढत गेले.
अशातच काही वर्षे उलटली आणि दुर्दैवाचा फेरा शिवाजीच्या आयुष्यात काळेकुट्ट रंग भरता झाला. शिवाजी पाच वर्षांचा असताना वडील मरण पावले आणि त्यानंतर वर्षभरातच आईनेही मृत्यू जवळ केला. एक तपाचा संसार अल्पावधीतच मातीमोल झाला. शिवाजीच्या शारीरिक पंगुत्वाला मानसिक व आर्थिक ओढगस्तीचा विळखा बसला. पाचही भावंडांचे आयुष्य भोवतालच्या सग्यासोयऱयांच्या मदतीने तग धरू लागले. शिवाजी सातव्या वर्षी शाळेची पायरी कसाबसा चढला अन् नवव्या वर्षी खुरडत खुरडत उतरलादेखील. मात्र, याच काळात त्याला श्री बेरड महाराज, श्री रामानंद, श्री भुजंगनाथ या व अशा अनेक दिग्गज सत्पुरुषांचा सहवास लाभला हीच काय ती जमेची बाजू!
एके दिवशी बारा वर्षांचा शिवाजी त्याच्या काटकुळ्या देहाची जुडी करून चिपचिप महाराजांच्या समाधी मंदिरातील कोपऱयात निपचित पडला होता तेव्हा अचानक श्री शंकर महाराज (धनकवडी) हे अष्टावक्र सत्पुरुष तिथे आगमन करते झाले आणि व्यंगदेही शिवाजीपाशी जाऊन म्हणाले, ‘‘ऊठ! झोपलास काय?’’ श्री शंकर महाराजांचा तो जबरदस्त आदेश शिवाजीच्या कानातून सरसर शिरत त्याच्या मेंदूला पार झिणझिण्या आणता झाला. त्याच्या कुडमुडय़ा देहात चैतन्य संचारले अन् तो खाडकन् उभा राहिला. श्री शिवाजी महाराजांच्या शब्दांत सांगायचे तर ‘‘श्री शंकर महाराजांनी माझ्या बखोटीला धरून मला उभे केले आणि तिथेच उभ्या असलेल्या श्री पंतमहाराजांकडे मला नेले. श्री पंतमहाराज (बाळेकुंद्री) आणि श्री शंकर महाराजांनी एकमेकांना मिठी मारली आणि मला त्यांच्यामध्ये दाबून धरले आणि मी ‘सरळ’ झालो.’’ अधू शिवाजीला स्वतःच्या पायावर उभा राहिलेला पाहून कोल्हापूरकर स्तंभित झाले.
श्री शिवाजी महाराजांची ही पहिलीच ओळख त्यांच्यातील असामान्यत्वाची झलक दाखवती झाली. पुढे त्यांच्या हातून घडलेल्या विविध लीलांमधून ती वृद्धिंगत आणि दृढ झाली. श्री शिवाजी महाराजांच्या अवतारकार्याचे समग्र वर्णन प्र. ना. दीक्षित लिखित ‘शिवस्मृती’ ग्रंथात केले आहे. सातारा जिह्यातील फलटण येथील पंढरपूर रस्त्यावर असलेल्या ‘विडणी’ गावात श्री शिवाजी महाराजांचे समाधी मंदिर आहे. सद्गुरू श्री शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास व प्रेम लाभलेले श्री शिवाजी महाराज, त्यांच्या सहवासात आलेल्या श्रद्धाळू भाविकांना अध्यात्माचे विविध अनुभव आणि प्रचीती देते झाले. पांगळ्याला ‘सुदृढ’ व निरक्षराला ‘ज्ञानी’ करण्याची किमया श्री शंकर गुरूंनी घडवली. मात्र त्यातून निर्माण झालेले हे अस्सल बावनकशी सोने राजघराण्यातील तालेवार मंडळींपासून ते झोपडीत राहणाऱया दरिद्री भक्तापर्यंत सर्वांना समृद्ध करते झाले. धनकवडी येथे श्री शंकर महाराजांच्या समाधीशेजारी श्री शिवाजी महाराजांची तसबीर ठेवण्यात आली आहे. या अनोख्या व अलौकिक शिष्याची ओळख आणि सन्मान त्याच्या सद्गुरूसोबत केला जाणे ही विलक्षण अपूर्वाईची गोष्ट आहे.




























































