
>> संजय मोहिते
एखाद्या विषयाचा ध्यास लागला की, माणूस किती झपाटय़ाने काम करू शकतो याचे तेजस्वी उदाहरण म्हणजे दिवाकर गंधे. खरं तर हे नाव अलीकडच्या काळात फारसे परिचित नसले तरी त्यांनी एक काळ गाजवला. लिखाणाचा ध्यास लहानपणापासूनच होता. लेखणीशी त्यांची नाळ अजूनही जोडलेली असून एखाद्या झपाटलेल्या माणसाप्रमाणे गंधे यांनी आयुष्यभर लेखन केले. तात्या या टोपणनावाने ते परिचितांमध्ये प्रसिद्ध आहेत. वयाच्या ऐंशीव्या वर्षीदेखील त्यांच्या लिखाणात ताजेपणा असून स्वतंत्र शैलीमुळे त्यांचे लिखाण वाचनीय असते. चित्रपट, संगीत, कथा, कादंबरी, ललित अशा साहित्याच्या विविध प्रांतांमध्ये त्यांनी अतिशय सहजपणे मुशाफिरी केली. ‘लोकराज्य’ हे सरकारी मासिक. फक्त सरकारचे उपक्रम, आकडेवारी, मंत्र्यांची उद्घाटने असा मजकूर या मासिकात असतो. मात्र दिवाकर गंधे यांनी या ‘लोकराज्य’ मासिकाला खऱया अर्थाने लोकमान्यता मिळवून दिली. तब्बल पंचवीस वर्षे त्यांनी या मासिकाचे संपादकपद भूषविले. सरकारी नोकरीत राहूनही त्यांनी या मासिकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. साहित्य, संस्कृती तसेच कलेचा टच देऊन त्यांनी हे मासिक लोकप्रिय केले. त्यांनी अनेक मान्यवर लेखकांचे साहित्य छापून ‘लोकराज्य’चे स्वरूपच बदलून टाकले. विशेषतŠ त्यांनी बालकवी, लता मंगेशकर, साने गुरुजी, चित्रपटाची पंच्याहत्तरी आदी विविध विषयांवर विशेषांक काढले. हे अंक अजूनही अनेक चोखंदळ वाचकांच्या संग्रही आहेत. सोशल नेटवार्ंकगच्या हल्लीच्या काळात एका क्षणात माहितीचा खजिना मिळतो, पण गंधे यांनी अतिशय मेहनतीने प्रत्येक विषयाची माहिती मिळवून अनेक पुस्तके अभ्यासून विशेषांक काढले. जुन्या चित्रपटांचा गंधे यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी अनेक वर्तमानपत्रे, मासिके तसेच पाक्षिकांमध्ये चित्रपटांविषयी भरभरून लिहिले आहे. गंधे म्हणजे माहितीचा अनमोल खजिना असेच म्हटले जाते. राज कपूरचे नाव जरी काढले तरी त्यांच्या आठवणींचा फ्लॅशबॅक सुरू होतो. राज कपूरचे चित्रपट, राजकमल स्टुडिओ, चित्रपट संगीत यावर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘रुपेरी पडद्यावरील सुवर्णाक्षरे’ हे त्यांचे पुस्तक अतिशय गाजले. या पुस्तकाचे प्रकाशन हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार नौशाद यांच्या हस्ते करण्यात आले होते. चित्रपट संगीताशिवाय त्यांना शास्त्र्ााrय संगीताची जाणही चांगली आहे. हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळात गंधे यांनी आपल्या लालित्यपूर्ण शैलीत भरभरून लेखन केले. त्याची दखल रेडिओ सिलोननेदेखील घेतली. 2007 मध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीची 15 जुनी गाणी प्रसारित करून आगळी भेट दिली. कथेच्या क्षेत्रात तात्यांनी अतिशय समर्थपणे मुशाफिरी केली. ‘पारिजात’, ‘हुसेनचा घोडा’ हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत, तर ‘चित्रगंध’, ‘नातं रुपेरी पडद्याशी’, ‘स्वरगंध’ ही पुस्तके अजूनही संदर्भ म्हणून अनेक जण वापरतात. ‘शतऋतू’ व ‘झुंबर’ या त्यांच्या दोन कादंबऱयाही गाजल्या, तर ‘जीवन एक उत्सव’ हा ललित लेखसंग्रह त्यांच्या शैलीदार लिखाणाचा उत्कृष्ट नमुना आहे. माणूस सच्चा असेल तर त्याचे लिखाणही सच्चे व कसदार असते, असे कविवर्य सुरेश भट नेहमी म्हणायचे. दिवाकर गंधे यांच्या बाबतीत हे शंभर टक्के लागू आहे. दिलदार माणूस, उत्तम लेखक, संगीत व चित्रपटांचे उपासक असलेले गंधे यांचे मूळ गाव जळगाव. खान्देशी मातीचे लहानपणीच त्यांच्यावर संस्कार झाले आहेत. वडील दत्तात्रय गंधे हे स्वातंत्र्य सैनिक होते. शिक्षणासाठी त्यांना नागपूर, इंदूर, मुंबईत सफर करावी लागली. हिंदी विषयात एम. ए. त्यांनी पुणे येथून केले. पत्रकारिता शिक्षण त्यांनी मुंबईला पूर्ण केले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी चार वर्षे पहिले विल्सन स्कूल, राममोहन इंग्लिश स्कूल, सोशल सर्व्हिस लीग स्कूल, श्री शिवाजी विद्यालय कन्याशाळा येथे अध्यापक म्हणूनही काम केले. दहावीला असताना त्यांची पहिली गोष्ट नागपूर आकाशवाणीवरून प्रसारित झाली होती. 1959 मध्ये त्यांनी पहिली लघुकथा लिहिली होती. उत्तर महाराष्ट्रातील त्या काळी प्रसिद्ध असलेल्या ‘गावकरी’मध्ये कथा प्रसिद्ध झाली होती. पुढे वेगवेगळय़ा वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांमधून त्यांनी आपल्या खास शैलीतून हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा जागर केला. त्यांचे चित्रपटविषयक लेखन ललितपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि रसभरीत असल्याने त्या काळात त्यांचा स्वतंत्र वाचकवर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला होता. ‘रुपेरी चांदणे’ हा तीन तासांचा चित्रपटांच्या सुवर्णकाळावरील कार्यक्रमही गंधे सादर करतात. हिंदी सिनेमांच्या सुवर्णकाळाचा हा साक्षीदार असलेला हा रुपेरी पडद्याचा ‘खास दोस्त’ आज 80 व्या वर्षीही त्या भारलेल्या चित्रपट जगताचा विषय निघाला की तेवढय़ाच उत्साहात भरभरून बोलतो. माहितीचा खजिना रिता करतो.
हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ ज्यांनी प्रथितयश वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून आपल्या लालित्यपूर्ण शैलीत शब्दबद्ध केला ते ज्येष्ठ सिने समीक्षक दिवाकर गंधे. त्या काळात सिनेसृष्टीत समर्थपणे मुशाफिरी करणाऱया गंधे यांनी 26 सप्टेंबर रोजी 80 व्या वर्षांत पदार्पण केले.





























































