‘झेवियर्स’ @ 150

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ब्रिटिशकालीन इंडो-गॉथिक बांधकामाचा अप्रतिम नमुना असलेल्या झेवियर्स कॉलेजच्या इमारतीत अनेक विद्यार्थी घडले. या विद्यार्थ्यांनी राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला. ऐतिहासिक इमारतीबरोबरच शिक्षण क्षेत्रात इतिहास घडवणाऱया झेवियर्स कॉलेजला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त या कॉलेजमध्ये महोत्सव साजरा केला जाणार आहे. या कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेले शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आज या वास्तूला भेट देऊन आपल्या कॉलेजवयीन आठवणींना उजाळा दिला.

झेवियर्स कॉलेजला 150 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त 4 ऑक्टोबरपासून 3 जानेवारी 2020 पर्यंत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह पिरामल गुपच्या संचालक डॉ. स्वाती पिरामल, थरमॅक्सच्या संचालक अनु आगा, जाहिरात क्षेत्रातील जॉसी पॉल, टेबल टेनिसपटू फारुख खोदिआजी, अभिनेत्री अमृता रायचंद, शायना एन. सी. आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना त्यांची मते मांडण्यात असलेले स्वातंत्र्य, त्याचप्रमाणे समानतेची वागणूक आपल्या कायम लक्षात राहिली. येथील कॅण्टीन, इमारतीच्या दगडी खांबाशेजारी बसून मित्रांसोबत मारलेल्या गप्पा हे सर्वच अविस्मरणीय असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या महाविद्यालयात शिकविण्यात आलेल्या नीतिमूल्यांमुळेच समाजात इतकी उंची गाठणे शक्य झाल्याचे सांगताना अन्य मान्यवरांनीही आपल्या कॉलेजजीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी कॉलेजचे व्हाइस प्रिन्सिपल फादर रॉय, फादर केथ तसेच प्राध्यापक नंदिनी सरदेसाई यांनी महोत्सवातील कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली.

नाटकापासून संगीत महोत्सवापर्यंत कार्यक्रमांची रेलचेल
झेवियर्सच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त एका लोगोचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ‘मेड ऑफ झेवियर्स’ या लोगोच्या माध्यमातून आपण झेवियर्सचे विद्यार्थी असल्याचा अभिमान आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला जाणार आहे. आजपासून सुरू झालेल्या या महोत्सवात नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीतील हिंदी, मराठी, इंग्रजी नाटकांचा महोत्सव होणार आहे. ज्युनियर कॉलेजचे सांस्कृतिक कार्यक्रम, सोशल सायन्स फोरम, लीडरशिप कॉन्क्लेव्ह, मल्हार 150, इंडो-वेस्टर्न म्युझिक कॉन्सर्ट, झेवियर्स हेरिटेज हंट तर जानेवारी 2020 मध्ये सेलिब्रेटी डिनरने या महोत्सवाची सांगता होणार आहे.