
सामना प्रतिनिधी । पुणे
बांधकाम सुरळीत सुरू राहू द्यावे, यासाठी पाच लाखांची खंडणी मागून ५० हजार रुपये घेणाऱ्या पाचजणांना वानवडी पोलिसांनी अटक केली, तर राष्ट्रवादी पुरस्कृत नगरसेविकेच्या मुलासह आणखी एकजण फरार आहे.
राष्ट्रवादी पुरस्कृत नगरसेविकेच्या मुलासह आणखी एकजण फरार आहे. माजीद उर्फ वसीम आमिन शेख (वय ३३, रा. घोरपडी पेठ), शोएब सुलतान मुजाहीद (वय ३५), परवेज इक्बाल पटवेकर (वय २८, दोघे रा. गुरुवार पेठ), फारुक युसूफ खान (वय २४, रा. घोरपडी पेठ), फैसल अन्वर शेख (वय २३, रा. भाग्योदयनगर) या पाचजणांना अटक केली आहे. अजहर सय्यद, साजीद रफिक शेख हे दोघे फरार आहेत. ३६ वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. अजहर सय्यद हा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नगरसेविका रुकसाना इनामदार यांचा मुलगा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलोपार्जित घराची डागडुजी सुरू असताना या कामादरम्यान एका कामगाराचा पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुुन्हा दाखल आहे. त्यानंतर हे काम सुरळीत सुरू राहावे, महापालिकेकडे कारवाई करण्यासाठी दिलेला अर्ज मागे घेण्यासाठी ५ लाख रुपयांची खंडणी अजहर सय्यद याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मागितली. त्यानंतर तडजोडीअंती १ लाख ८० हजार रुपये देण्यास फिर्यादी तयार झाले. हे पाचजण हडपसर येथील कनक हॉटेल धोबी घाट येथे आले असता, त्यांना ५० हजार रुपये घेताना पोलिसांनी पकडले. यामध्ये एका पत्रकाराचाही समावेश आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक ए. ए. शेटे करत आहेत.
























































