बेकायदा बांधकामे-अतिक्रमणांची आता खैर नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

बेकायदा बांधकामांवरील कारवाईसाठी आता पालिकेच्या सातही विभागीय परिमंडळांना स्वतंत्र सहाय्यक आयुक्त मिळणार आहेत. त्यामुळे अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामांवरील कारवाई आणखी तीक्र होणार आहे. यामध्ये अतिक्रमण निर्मूलन विभागात सहाय्यक आयुक्तांची चार अतिरिक्त पदे निर्माण केली जाणार असल्यामुळे प्रत्येक परिमंडळाला कारवाईसाठी स्वतंत्र अधिकारी मिळणार आहे.

अतिक्रमण निर्मूलन खात्यातील सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून सातही परिमंडळांमध्ये कारवाई करताना संबंधित ठिकाणचा लेखाजोखा ठेवणे, देखरेख ठेवणे, पाहणी करणे, सर्वेक्षण करणे, पोलिसांची मदत मिळवण्यासाठी समन्वय साधण्याचे काम केले जाते. मात्र सध्या पालिकेकडे सात परिमंडळांसाठी केवळ तीन सहाय्यक आयुक्त उपलब्ध आहेत. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलनाचे काम करताना प्रशासनावर कामाचा ताण वाढतो. शिवाय कारवाईवर मर्यादा येतात. त्यामुळे प्रत्येक विभागासाठी एक सहाय्यक आयुक्त मिळावा यासाठी आणखी चार सहाय्यक आयुक्तांची अतिरिक्त पदे निर्माण केली जाणार आहेत.

विधी समितीच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी
अतिरिक्त सहाय्यक आयुक्तपदांच्या पगारावरील खर्च अर्थसंकल्पातून केला जाणार आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव विधी समितीमध्ये मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. या पदांसाठी 15600 – 39100 + 6600 ग्रेड पे अशी वेतनश्रेणी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या आस्थापनेवर पहिल्या सहा महिन्यांकरिता देण्याचे प्रस्तावित आहे. विधी समितीच्या मंजुरीनंतर तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

summary- BMC to prevent encroachment of infrastructures