
विशेष प्रतिनिधी | मुंबई
गोरगरीब रुग्णांचा आधार अशी प्रतिमा असलेले विख्यात नेत्रविकारतज्ञ ‘पद्मश्री’ डॉ. तात्याराव लहाने आत्मचरित्र लिहिताहेत. पाठीच्या दुखण्याने आजारी असलेले तात्या सध्या वैद्यकीय आदेशाने बेडरेस्ट घेताहेत, पण आयुष्यभर कष्टच उपसलेला हा तपस्वी पाठीचं दुखणं आणि कुशीवरचं झोपणं यावर मात करीत आत्मचरित्राचं काम करतोय. सिनेमा-नाटकात नाटय़ निर्माण करण्यासाठी प्रसंग रचावे लागतात, पण तात्यांच्या आयुष्यात असे नाटय़मय प्रसंग खरोखरच घडले… घडत आहेत. त्यामुळे तात्यांचं हे आत्मचरित्र कोणत्याही सिनेमा-नाटकाच्या कथेहूनही अधिक नाटय़मय असेल. तात्या बिछान्यावर पडल्या पडल्या ही संघर्षगाथा शब्दबद्ध करताहेत.
8 ऑक्टोबरला तात्यांना पाठीच्या दुखण्याने गाठले. डॉक्टरांनी तीन आठवडे पूर्ण बेडरेस्टचा आदेश काढला. या विश्रांतीतच मग आत्मचरित्राच्या कल्पनेला आकार देण्याचं काम सुरू झालं. तात्या म्हणतात, फक्त झोपायचं, काहीच काम करायचं नाही ही कल्पनाच असह्य होती. म्हणून मी माझं चरित्र लिहायला घेतले. तेही एक कामच आहे जे माझ्या नेहमीच्या कामाच्या धबडग्यात राहून गेलं होतं. मला बेडरेस्ट आहे तीही कशी तर पाठीवर झोपायचं नाही, तर कुशीवर झोपायचं. मी कुशीवर झोपून लिहायचा प्रयत्न केला, पण जमेना. मग एका मित्रानं फोन आणून दिला. त्यात देवनागरी लिपी आहे. मी जे बोलतो ते हा फोन देवनागरीत लिपीबद्ध करतो. त्यात चुका असतात, पण त्या दुरुस्त करण्याचं कामही नंतर करतो.
डॉ. रागिणी पारेख माझं इंग्लिश चरित्र लिहीत आहेत. ते लवकरच प्रकाशित होईल. त्यादरम्यान ‘तात्या लहाने: अंगार’ हा सिनेमाही येऊन गेला, पण त्यातून सगळं मांडणं शक्य नसतं. म्हणून मग हा आत्मचरित्राचा प्रयत्न आहे. खरं तर 2008 पासूनच माझ्या मनात तसा विचार सुरू होता. पण आता या आजारपणाच्या निमित्ताने तो कागदावर उतरतोय, असे सांगून तात्या पुढे म्हणाले, रोज सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास माझं हे आत्मचरित्राचं काम चालतं. 39 व्या वर्षी मला किडनीचा आजार झाला. त्यानंतर माझा ‘पुनर्जन्म’च झाला होता. त्यामुळे या पुस्तकात 39 प्रकरणं आहेत. सुमारे पाचशे ते सहाशे शब्दांचे एक प्रकरण असेल.
गरिबीशी लढा, दुष्काळाशी सामना, शिक्षणासाठी संघर्ष याबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून प्रवेश केल्यानंतर आलेल्या अडचणी जगासमोर मांडणार आहे. त्यांचं खरं रूप बरोबरच मानसन्मान पुरस्कार हे सगळं या आत्मचरित्रात आहेच, पण त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील घाणेरडय़ा राजकारणाचे काही संदर्भही वाचायला मिळणार आहेत. तात्या म्हणाले, ‘या पुस्तकातील प्रत्येक शब्दच नव्हे तर प्रत्येक अक्षर सत्यच सांगेल. त्यामुळे बरेच लोक दुखावतील, रागावतील, पण त्याचबरोबर अनेकांना समाधान मिळेल, आनंदही होईल.
त्यांची नावं तर घेणारच!
माझ्या एवढय़ा वर्षांच्या शासकीय सेवेत मी लाखो रुग्णांना दृष्टी मिळवून दिली असे सांगतानाच तात्या म्हणाले, पण हे यशही काही जणांना पाहवत नव्हते. ते कधी मित्राचा मुखवटा घालून आले तर कधी हितचिंतकाची झूल पांघरून त्या सगळय़ांचा शक्यतो नावानिशी उल्लेख मी करणार आहे असे सांगून तात्या म्हणाले, ‘काही डॉक्टरांनीही माझ्या मार्गात काटे पेरले. अधिकाऱयांनी त्रास दिला आणि काही मंत्र्यांनी तर अडथळे निर्माण केले. त्या सर्वांचा उल्लेख करणार आहे. एका मंत्र्याने तर खूपच छळले. त्याच्यावर एक अख्खं प्रकरण असणार आहे.’
12 फेब्रुवारीला प्रकाशन
12 फेब्रुवारीला माझा 62 वा वाढदिवस आहे. त्याच दिवसाचे औचित्य साधून पुस्तकाचे प्रकाशन होईल अशी माहिती तात्यांनी दिली. ‘समकालीन प्रकाशन’ ही प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रसिद्ध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुस्तकाचा निधी हॉस्पिटलला
या पुस्तकाच्या विक्रीतून जो निधी येईल तो गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी खर्च करण्याचा मानस तात्यांनी व्यक्त केला. निवृत्तीनंतर स्वतःचे रुग्णालय सुरू केले तर तिथे गरीब रुग्णांच्या सेवेसाठी हा निधी खर्च होईल असे त्यांनी सांगितले.



























































