
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत यापुढे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे तर शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल. कारण यापुढे मुंबईसह राज्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा 2003 (कोटपा) कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा (2003) अर्थात ‘कोटपा’ कायद्याअंतर्गत महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याबाबत आज मंत्रालयात गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या दालनात बैठक झाली. तंबाखूजन्य पदार्थांबाबत असलेल्या ‘कोटपा’ कायद्यात अतिशय कडक तरतुदी आहेत. राज्याच्या काही भागांत या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आता संपूर्ण राज्यात ‘कोटपा’ कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल. नंदुरबार तसेच यवतमाळ जिल्हा ज्याप्रमाणे तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आला आहे त्याच धर्तीवर राज्याच्या इतर जिह्यांत शालेय शिक्षण विभागाने तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी पावले उचलावी, असे आवाहन डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
‘कोटपा’ कायदा प्रभावी
मुंबईसह इतर भागांत सध्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत कारवाई होते, पण ही कारवाई प्रभावीपणे होत नसल्याने ‘कोटपा’ कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास 200 रुपये दंडापासून शाळांच्या 100 यार्डच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्यास अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्याची तरतूद असल्याने मुंबईसह संपूर्ण राज्यात या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे डॉ. रणजीत पाटील म्हणाले.




























































