रावणदहनावेळी रेल्वेने चिरडले; 58 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अमृतसर

रावणदहनावेळी शेकडो लोकांना भरधाव रेल्वेने चिरडल्याने किमान 58 जण ठार झाले. पंजाबमधील अमृतसर येथील जोडाफाटा येथे या भयंकर घटनेने अवघा देश सुन्न झाला आहे. रावणदहनावेळी ट्रकवर उभे असलेल्या शेकडो लोकांना फटाक्यांच्या आतषबाजीत रेल्वेचा हॉर्न ऐकू आलाच नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली. रेल्वे ट्रकवर रक्तामांसाचा अक्षरशः चिखल झाला असून मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता. 72 जण जखमी असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांतील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे. रेल्वे प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

अमृतसर येथील जोडाफाटा परिसरात मैदानावर अनेक वर्षांपासून दसऱयाच्या दुसऱया दिवशी रावणदहनाचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात होतो. रावणदहनाचे ठिकाण रेल्वेरुळाच्या अगदी जवळ आहे. सायंकाळी हजारो लोकांची गर्दी उसळली होती. काही लोक रेल्वे ट्रकवर उभे होते. रावणदहन सुरू होताच मैदानावरील आणखी लोक रेल्वे ट्रकवर धावत आले त्यामुळे गर्दी वाढली. फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. लोकांनी मोबाईल कॅमेऱयात हे दृश्य टिपण्यास सुरुवात केली. तेवढय़ात जालंदरहून अमृतसरकडे येणारी रेल्वे भरधाव वेगाने आली आणि घात झाला. रुळावर उभे असलेल्या आणि मैदानावरून धावत येणाऱया अनेकांना चिरडून रेल्वे पुढे निघून गेली.

– या भयंकर दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंजाबचे मुख्यमंत्री अमररिंदर सिंग यांच्यासह अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे ग मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली असून, रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले.

– रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे अमेरिकेच्या दौऱयावर असून, अपघातानंतर मायदेशी परतण्यास ते निघाले आहेत. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, रेल्वे बोर्ड चेअरमन अश्विनी लोहणी यांच्यासह रेल्वे अधिकाऱयांचे पथक दिल्लीतून रवाना झाले आहे.

अपघातानंतर नवज्योत कौर निघून गेल्या
रावणदहन कार्यक्रमाला आमदार नवज्योत कौर सिद्धु हजर होत्या. त्यांच्या समोरच रेल्वेने लोकांना चिरडले. एवढी भयंकर घटना घडल्यानंतरही त्या थांबल्या नाहीत. तत्काळ आपल्या गाडीत बसून निघून गेल्या. पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धु यांच्या त्या पत्नी आहेत. विशेष म्हणजे त्या स्थानिक आमदारही आहेत. संतप्त लोकांनी नवज्योत कौर यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या.