
सामना प्रतिनिधी, वसई
मुंबईवरील ‘26/11’ चा हल्ला होऊन अनेक वर्षे लोटली तरीही अजून सागरी सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसून आले आहे. अर्नाळ्याच्या समुद्रात रोज रात्री काही अज्ञात व्यक्ती मच्छिमारीच्या नावाखाली ‘घुसखोरी’ करतात आणि पहाटे तीन – चारच्या सुमारास पळून जातात. भिवंडी तसेच मुंबईच्या भागातून गेल्या तीन महिन्यांपासून हे ‘हौशी’ मच्छीमार अर्नाळ्यात येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी बघितले असून ते नेमके कोण आहेत याबाबत गूढ निर्माण झाले आहे. दरम्यान पोलिसांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले असले तरी ‘26/11’ चा धोका निर्माण झाल्याने या घुसखोरांना लवकरात लवकर शोधा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
अर्नाळ्याच्या खोल समुद्रात स्थानिक मच्छ्मार पिढ्यान्पिढ्यांपासून मासेमारी करतात. मात्र बाहेरून आतापर्यंत पुणीच मासेमारीसाठी आले नव्हते. रात्री आठ वाजल्यानंतर कारमधून 15 ते 20 जणांच्या गटाने विशिष्ट लोक अर्नाळ्याच्या समुद्रकिनारी येत असून ते मासेमारी करण्याच्या बहाण्याने समुद्रात जातात. त्यांच्यासोबत रबरी टायर, आइस बॉक्स, रस्सी, गळ आदी साहित्य असते. समुद्रकिनाऱयावर असलेल्या छोटय़ा होडी चालकांना हे लोक चिरीमिरी देऊन समुद्रात सोडायला सांगतात. तेथील एका मोठय़ा होडीला रस्सी बांधून टायरवर बसून पहाटेपर्यंत गळ टाकतात.
या संशयित मच्छिमारांना किती मच्छी मिळते हेदेखील अद्याप समजलेले नाही. आतापर्यंत 15 ते 20 जणांच्या गटाने येणाऱ्यांचा आकडा पन्नासवर जाऊन पोहोचला. मासेमारीच्या नावाखाली हे ‘हौशी’ मच्छीमार एखादी स्फोटक वस्तू घेऊन समुद्रात गेले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल स्थानिक मच्छिमारांनी केला आहे.
15 दिवसांपूर्वीच अर्नाळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर टाईम बॉम्बसदृश स्फोटक वस्तू सापडल्यान खळबळ उडाली होती. भिवंडी व मुंबईतून येणाऱ्या या संशयास्पद मच्छिमारांची त्वरित चौकशी करावी अन्यथा लांडगा आला रे आला… अशी स्थिती होईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.
सागरी पोलीस ठाणे काय करते?
गेल्याच वर्षी अर्नाळा समुद्रकिनाऱयावर सागरी पोलीस ठाणे बांधण्यात आले आहे. मात्र राजरोसपणे काही अनोळखी मच्छिमार येऊन रात्री मासेमारी करतात याचा थांगपत्ता सागरी पोलीस ठाण्याला नव्हता. काही स्थानिक लोकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांना जाग आली असून छोटय़ा होडय़ांच्या सहाय्याने समुद्रात जाऊन रबरी टायरच्या आधाराने मासेमारी करणाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनीदेखील त्यास दुजोरा दिला आहे. अर्नाळा समुद्रकिनाऱ्यापासून या मंडळींना पळून जाण्यासाठी मुंबई-अहमदाबाद हायवेजवळ असून मनोरमार्गे नाशिकलादेखील धूम ठोकता येईल. हा संपूर्ण प्रकार धक्कादायक असल्याचे स्थानिक भूमिपुत्रांचे म्हणणे आहे.
summary- suspicious happening in arnala beach




























































