
सामना प्रतिनिधी । साक्री
अजंग येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्याने घरी परत जात असताना झालेल्या वाहन अपघातात दोन जण ठार तर दहा जण जखमी झाले आहेत.
साक्री तालुक्यातील छडवेल पखरून गावाजवळ आज दुपारी एकच्या सुमारास साक्रीकडून दहिवेलकडे जाणारा मॅक्स टेम्पो आणि दहिवेलकडून येणारा ट्रक या दोन्ही वाहनांमध्ये अपघात झाला. सर्व विद्यार्थी साक्री तालुक्यातील असून स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, अजंग (ता. मालेगाव) येथे शिक्षण घेत होते.
आज सकाळी घरी जाण्यासाठी गावाकडील वाहनाने जात असताना विद्यार्थ्यांवर काळाने घडलेल्या अपघातात मयत दीपाली गावीत (13), संदीप गावीत हे दोन ठार झाले तर दिलवर चौरे (10, रा. पाचमौली), करिना कांबळे (13, रा. जामखेली), दीक्षांत गावीत (10, पिंजारझाडी), मृणाल भोये (10, जामखेली), भारती बागुल (13, रा. गुलतारे), कन्हैया भोये (30, जामखेली), भरत गावीत (50, पिंजारझाडी), हिरालाल चौरे (55, पाचमौली), राजेंद्र पवार (55, मावजीपाडा), वीरेंद्र पवार (10, मावजीपाडा) हे जखमी झाले आहेत.
































































