
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जानेवारीपासून 139 करून 142 इतका करण्यात आला. तेव्हापासूनची राहिलेली थकबाकी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात दिली जाणार आहे. याविषयीची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2018 या 9 महिन्यांच्या कालावधीची 3 टक्के महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम ही ऑक्टोबर 2018 च्या वेतनात रोखीने देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत अशी माहिती अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय आज वित्त विभागाने काढला आहे.
महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम मिळणार असली तरी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने मंत्रालयात मंगळवारी निदर्शने करण्यात येणार आहेत.




























































