
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवणवासीयांनी बनविलेल्या नरकासुर प्रतिमांची धिंड काढून पहाटे मालवण बंदर जेटी समुद्र किनारी त्यांचे दहन करण्यात आले.
वाईट प्रवृत्ती व विचारांचा नाश करण्यासाठी नरकासुराच्या प्रतिमेचे दहन दरवर्षी मालवणात केले जाते. गेल्या काही वर्षात मोठमोठ्या नरकासुर प्रतिमा करून त्यांचे दहन मोठ्या प्रमाणावर केले जाते. यात शहरातील अनेक बाळगोपाळ मंडळे आपापल्या संकल्पनेतून नरकासुराच्या आकर्षक व भव्य प्रतिमा तयार करून त्याचे दहन करतात. नरक चतुर्दशी दिवशी दहन करण्याअगोदर रात्री व पहाटे शहरातून या प्रतिमांची वाजत गाजत धिंड काढण्यात येत असे. मात्र शासनाने डीजे वर बंदी घातल्याने तसेच फटाके वाजविण्यावर बंधने आणल्याने यावर्षी मालवणात नरकासुर दहनाच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांनी दक्षता घेत बाळगोपाळ मित्रमंडळांची बैठक घेऊन नरकासुर धिंडीत नियमांचे व वेळेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बाळगोपाळ मंडळांनी रात्रभर धिंड न काढता केवळ बेंजोच्या तालावर काल सोमवारी रात्री अकरा पर्यंत नरकासुरची धिंड काढली. त्यानंतर पहाटे चार वाजल्यापासून पुन्हा धिंड काढून नरकासुर प्रतिमा बंदर जेटी येथे नेऊन फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे दहन करण्यात आले.
यावर्षीही मालवणात अनेक आकर्षक पद्धतीने नरकासुर प्रतिमा बनविण्यात आल्या होत्या. बंदर जेटी येथे सुमारे २५ नरकासुर प्रतिमांचे दहन करण्यात आले. हे दहन पाहण्यासाठी नागरिकांनी जेटी परिसरात मोठी गर्दी केली होती. पहाटे ४ वाजल्यापासून ते सकाळी ८ वाजेपर्यन्त नरकासुर दहन करण्यात येत होते. यावर्षी मालवणात पोलीस व बाळगोपाळ मंडळ यांच्यातील सहकार्याने नरकासुर धिंड व दहन कार्यक्रम कोणतेही गालबोट न लागता पार पडला.




























































