खल्वायनचे ‘सुंदर मी होणार’ …अतिसुंदर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गेश आखाडे। रत्नागिरी 

पु.ल.देशपांडे यांच्या जन्म शताब्दी वर्षात पु.ल.ची ‘सुंदर मी होणार’ ही अजरामर कलाकृती पहायला मिळणं म्हणजे पु.ल.देशपांडेच्या सासुरवाडीत “आजचि दसरा…आजचि दिवाळी”.राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या खल्वायन संस्थेने सादर केलेला सुंदर मी होणार हा नाट्यप्रयोग कलाकारांच्या सांघिक ताकदीवर अतिसुंदर झाला.

राज्य नाट्य स्पर्धेत एकामागून एक दर्जेदार संहिता रंगमंचावर सादर होत आहेत.खल्वायन ने ‘सुंदर मी होणार’चा एक सफाईदार प्रयोग सादर केला.जुनी गाजलेली नाटक करण्याची इर्ष्या अनेकांच्या मनात असते पण पूर्वीचे तीन अंकी नाटक सध्याच्या राज्य नाट्यस्पर्धेत दोन अंकात करताना खूपच कसरत करावी लागते. तीन अंकी नाटकाचे दोन अंकात संकलन करायचे तेही कथानकाला कुठेही धक्का न लावता म्हणजे तारेवरची कसरत…त्यात पु.लं.च नाटक, भाईंचे शब्द म्हणजे काय कमी करायचं हा यक्ष प्रश्न. ही तारेवरची कसरत दिग्दर्शक मनोहर जोशी यांनी लीलया पेलली म्हणून ‘सुंदर मी होणार’चा प्रयोग सुंदरच झाला.

संस्थान खालसा होऊन एकाधिकारशाहीची सत्ता गेल्यानंतरही अंगावरची राजेशाही वस्त्र आणि डोक्यातला सत्तेचा माज न उतरलेल्या महाराजाच्या घरातील हि कहाणी. महाराजांच्या चारही मुलांना महाराजांचा स्वभाव आवडत नसतो. संस्थान खालसा झाली तरी राजेशाही ठेंभा मिरविणे त्यांना आवडत नव्हते. मोठी मुलगी हेमंत आजारपणामुळे त्रस्त असल्याने वडिलांसमोर ती हतबल असते. स्वताच्या पायावर उभं राहून सुंदर जग पहाण्यासाठी ती धडपडत असते. कवी मनाची शोषित हेमा दिदीची भूमिका शमिका जोशी यांनी सहजसुंदर पार पाडली. अनेक संवाद खुर्चीत बसून असले तरी अभिनयातून एककल्लीपणा आणू दिला नाही. सुंदर मी होणार हि शीर्षक कविता अभिनयाबरोबर काव्यवाचनाचाही एक दाखला होता. पण चारही मुलामध्ये बंडाचा झेंडा फडकवते ती महाराजाची दुसरी मुलगी बेबी. बंडखोर बेबीची भूमिका दिप्ती कानविंदे हिने साकारताना तितकीच मोठ्या बहिणीशी प्रेमळ आणि गावातील सामान्य कुटूंबातील तरूणा बरोबर प्रेम करून महाराजांच्या राजेशाही वृत्तीच्या बंदिस्त भिंती तोडून टाकतानाचा करारीपणा तीने उत्तम वठवला. कठोर, करारी महाराजांची भूमिकेत वामन जोग यांनी जान आणली. करारी चेहरा, बेदरकार पण नजरेत सत्ता गमावल्याची सल वामन जोग यांच्यामध्ये दिसून आली. खणखणीत आवाजामुळे महाराज अधिक लक्षात रहातात. संजय या नाटकाचा नायक मनोहर जोशी यांनी ताकदीने साकारला संजय हा प्रतिभावंत साहित्यिक पु.ल.नी ज्या शब्दसामर्थ्याने मांडलाय त्याला मनोहर जोशी यांनी निश्चितच न्याय दिलाय. सुरेशच्या भूमिकेत हेरंब जोगळेकर रूबाबदार दिसले.

दिग्दर्शकाचे इथे कौतुक करायला हवं.कारण एखादा गद्य नाटकातील अभिनेता उभा करून ध्वनीमुद्रित गाणी सादर करता आली असती पण गायक अभिनेता घेऊन नाटक जिवंत करण्याची धडपड दिसली आणि ती यशस्वीही झाली. डॉक्टरच्या भूमिकेत विजय जोशी यांनी आपली छाप सोडली. थकलेला डॉक्टर नाटकात काही प्रसंगात असला तरी लक्षात रहातो. सुमनच्या पहिल्या एन्ट्रीने नाटकात धमाल आणली. गंभीर विषयावरच्या नाटकात सुमनच्या भूमिकेत श्वेता जोगळेकर भाव खाऊन गेली.

कौस्तुभ जोशी, गणेश जोशी आणि नकुल नाडकर्णी यांनी आपल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या. दादा लोगडेनी नेपथ्यातून तत्कालीन राजवाडा उभारला. गोपीकांत भुवड आणि अमेय धोपटकर यांची प्रकाशयोजना आणि रामदास मोरे आणि गौरव महाजनी यांचे संगीत या दोन्ही जमेच्या बाजू ठरल्या. श्रीनिवास जोशी आणि प्राजक्ता जोशी यांनी वेशभूषा आणि दादा लोगडे आणि रामदास मोरे यांनी उत्तम सांभाळली. प्रदीप तेंडूलकर हे नाटकाचे सुत्रधार होते.