
सामना ऑनलाईन । श्रीनगर
राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या जम्मू-कश्मीरमध्ये आज राजकीय घडामोडींना नाटय़मय वळण लागले. पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन यांनी व्हॉट्सऍपवर पत्र पाठवून आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपालांना ट्वीटरवर संदेश पाठवून जम्मू-कश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केलेला असतानाच राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-कश्मीर विधानसभा बरखास्त केली. त्यामुळे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या बळावर सरकार स्थापनेचा दावा करणाऱया मेहबूबा मुफ्ती आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सज्जाद लोन यांच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे.
सत्तेचे दावे ट्विटर, व्हॉटस्अॅपद्वारे
मी आता श्रीनगरमध्ये आहे. यामुळे मला तुमची ताबडतोब भेट घेता येणार नाही. मात्र काही तासांतच आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार आहोत, असे पत्र पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांनी राज्यपालांकडे ट्विटरवरून पाठवले. मला पीडीपी-29, नॅशनल कॉन्फरन्स-15, काँग्रेस-12 अशा 56 आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सने मला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिल्याचे आपल्याला प्रसिद्ध माध्यमांद्वारे समजले असेल, असेही मुफ्ती यांनी राज्यपालांना उद्देशून म्हटले आहे. यानंतर पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोने यांनी व्हॉटस्ऍपवरून राज्यपालांच्या पीएकडे सत्ता स्थापन्येचा दावा करणारे पत्र पाठवले. आपल्याला भाजपच्या 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानंतर सरकार आल्पमतात आले. यामुळे मुफ्ती यांनी जूनमध्ये राजीनामा दिला. यानंतर 19 जूनपासून सहा महिन्यांसाठी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.




























































