सायकल सफारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलाखत…नितीन फणसे

सायकलिंग हा कितीही सर्वांगसुंदर व्यायाम आणि प्रदूषणमुक्त वाहन असलं तरी मुंबईत सायकलवरून प्रवास ही एक कल्पनेतीलच गोष्ट राहते. पण उत्साही तरुणाईने यावर मात देत रात्रीचे सायकल क्लब स्थापन केले आहेत. जे पहाटे किंवा रात्री मुंबईच्या मोकळय़ा रस्त्यांवर मनमुराद सायकल चालवतात…

पूर्वी सायकल हे सर्वसामान्यांचं वाहन होतं. पण आता सायकल घ्यायची तर 10 ते 12 हजार मोजावे लागतात. याबाबत बोलताना विनोद पाष्टे म्हणाले की, सायकलचा जन्म 1900 मध्ये झाला. त्यावेळी वाहन म्हणून लोक सायकल वापरायचे. पण नंतर जसजशी प्रगती होत गेली तसतशी वाहतुकीची साधने वाढायला लागली. सायकलीमुळे इच्छित जागी पोहोचायला लोकांना खूप वेळ लागायचा. म्हणून सायकल टाळून वेगवान वाहनांनी जायला लोकांनी सुरुवात केली. त्यामुळे सायकल मागे पडली. अर्थात इतर वाहनांच्या तुलनेत सायकल स्वस्त म्हणून ती सामान्यांचे वाहन म्हटले जाते. मुळात आपल्याला सायकल कोणत्या कारणासाठी हवी आहे त्यावरून तिची किंमत ठरते. त्यातील सोयी सुविधांमुळे किंमत वाढते. फिचर्स वाढली तर किंमत वाढते. स्पोर्ट्स सायकलीत ऍल्युमिनियम बाईक आणि कार्बन बाईक असे दोन प्रकार येतात. ऍल्युमिनियम बाईक साधारणपणे 12-15 हजारांपासून सुरुवात होते. गियर्स कोणत्या प्रकारचे आहेत, ते संख्येने किती आहेत त्यावरही किंमत ठरते. गियर्स शिफ्टर कोणत्या प्रकारचे आहेत त्यानुसारही किंमत वाढते. ऍथलिट लोकांच्या सायकली कार्बन बाईक्स असतात. त्यांना रोड बाईक्स म्हणतात. त्या जरा महागडय़ा असतात.

सर्वसामान्यांनी सायकलिंगच्या मॅरेथॉनमध्ये जायचं तर काय करायचं? असं विचारता ते म्हणाले, दररोज ठरावीक अंतरापर्यंत सायकल चालवण्याचा सराव करायला हवा. हळूहळू ते अंतर वाढवत जायचे. अशा तऱहेने मॅरेथॉनसाठी तयारी करता येते. आपण किती अंतर सायकलीने पार करू शकतो हे आधी जाणून घ्या. पूर्ण सरावानंतरच मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा. इतर गाडय़ांप्रमाणे सायकलींचीही व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. सायकल सहा महिन्यांतून एकदा किंवा वर्षातून किमान एकदा सर्व्हिसिंग करून घेतली पाहिजे. अलीकडे पर्यटनासाठीही लोक सायकलीचा वापर करू लागले आहेत. मीही सायकलीवरून अशा बऱयाच टुर्स केल्या आहेत. पुणे-गोवा मी पाचवेळा केली आहे आणि पुणे-मुंबई तीनवेळा केली आहे. फिटनेसची आवड असणाऱयांना सायकलीवरून रपेट मारायला आवडतंच… हे लोक दोन-तीन दिवस सुट्टी घेऊन सायकलवरून लाँग ड्राईव्हला जातात.

आजकाल कुठे ना कुठेतरी सायकल सफारी आयोजित होत असतात ही एक चांगली गोष्ट आहे. फिटनेससाठी काहीतरी करायची लोकांची इच्छा असते. पण काय करायचं हे ठरत नाही. आपल्याला एकटय़ाने सायकल चालवणे जमेल का हाही विचार असतो. अशावेळी सायकल सफारी खूप फायद्याच्या ठरतात. आयोजकांनी सर्व रूट ठरवलेले असतात. वेळेला काय लागेल ते साहित्यही त्यांनी ठेवलेले असते. त्यांची टीम चिअरअप करायला हजर असते. त्यांना बॅकअप सपोर्ट असतो. वैद्यकीय सुविधा असतात. त्यामुळे अशा सफारी चांगल्या असतात. अशा सफारींमुळे सायकलची लोकप्रियता अजून वाढेल यात शंका नाही.

तरुणाईची पहिली पसंत

सायकलिंगची आवड तरुण पिढीमध्ये नक्कीच वाढली आहे. फिटनेससाठी काहीतरी करायचे असेल तर सायकल हा उत्तम पर्याय असू शकतो. पण ज्या लोकांना सकाळी वेळ मिळत नाही ते रात्रीच्या वेळी निवांतपणे सायकल चालवतात. दिवसा रहदारी खूप असते. त्यामुळे रात्री शांतपणे सायकलींग करता येते. सायकल चालवायचीच आहे. मग सकाळी काय किंवा रात्री काय… पुण्यात सायकली भाडय़ाने मिळतात. मुंबईचं मला माहीत नाही. पुण्यात एका ठिकाणी लावलेली सायकल घेऊन फिरायला जायचे. आणि तेथे असलेल्या विशिष्ट ठिकाणी सायकल लावून ठेवायची. त्यासाठी एक ऍप डाऊनलोड करावे लागते. तासाला फक्त 5 किंवा 10 रुपये एवढाच खर्च या भाडय़ासाठी लागतो. रात्री जेवण झाले की कुटुंबे सायकली भाडय़ाने घेऊन राऊंड मारून येतात. यात चांगला व्यायाम होऊन जातो.