जळगाव ग्रामीण मतदारसंघातील १३६ किमीच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

जळगांव ग्रामीण मतदार संघातील जळगांव व धरणगाव तालुक्यातील १३६ किमीच्या ७ रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. यासाठी शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सतत पाठपुरावा केला होता. तर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रस्त्यांच्या विकासासाठी जि प सदस्य प्रतापराव पाटील यांनी ठराव मांडला होता.

असे आहेत रस्ते
राष्ट्रीय महामार्ग ६ असोदा- देऊळवाडे रस्ता – १३ किमी , घार्डी – नांद्रा – लाडली रस्ता – १२ किमी , भादली – गाढोदा – चमगाव – सोनवद रस्ता – ११ किमी , अहिरे बु. – पष्टाने – धानोरा – आनोरा – गारखेडा – धरणगाव – बोरगाव रस्ता – ३० किमी , धरणगाव – बाभळे – खरदे- नारणे -नांदेड रस्ता – २३.५०० किमी , रोटवद – साळवा – खरदे बु. – भामर्डी – उखळवाडी – सोनवद रस्ता- १५ किमी, भोकर – गाढोदा – दहिदुल्ले – खामखेडा – निमखेडी रस्ता – १७.५०० किमी , रिधुर – नांद्रा – चांदसर कवठळ ते प्रमुख जिल्हा मार्ग ७९ शेरी रस्ता – १३.५०० किमी. अशा जिल्हा परिषदेच्या ७ रस्त्यांच्या १३६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मंजुरी मिळाली आहे.

सदर रस्त्यांवरील गावांची संख्या, लोकसंख्या व रस्त्यांवर होणारा वापर तसेच जिल्हा परिषदेचा ठराव विचारात घेऊन शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या ७ रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दरजोन्नती करण्यास मंजुरी दिली आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांची निधी अभावी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी खूप जिकरीचे झाले आहे. नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दखल घेऊन सदर रस्त्यांचा दरजोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला आहे. आता जि.प. कडील १३६ किमीचे हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्याने या रस्त्यांचा कायापालट होणार आहे.

परिणामी रस्ते विकास योजना २००१- ०२१ मधील जळगाव जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या एकूण लांबीत १३६ किमीने वाढ होऊन एकूण लांबी २८८३.७९९ किमी इतकी झाली आहे. तसेच इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची एकूण लांबी ८६.५०० किमीने घट होऊन एकूण लांबी १६२०.६०० किमी झाली आहे. तसेच ग्रामीण मार्ग रस्त्यांच्या एकूण लांबीत ४९.५०० किमीने घट होऊन एकूण लांबी ६२८१.४५ किलोमीटर इतकी राहिली आहे.