पैशांपेक्षा रंगभूमी बौद्धिकदृष्ट्या सशक्त करा, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

रंगभूमी कधी थांबणार नाही. माझ्या नंतरची पिढी अतिशय उत्तम काम करत आहे. मी ‘काशिनाथ घाणेकर’ चित्रपट काशिनाथ यांच्यासाठी पाहिला नाही तर सुबोध भावेच्या अभिनयासाठी पाहिला. असे कलाकार जर रंगभूमीला लाभत असतील तर रंगभूमी कधीच बंद पडणार नाही. आपल्या अभिनयामध्ये सुधारण्यासाठी या रंगभूमीचा वापर करा. पैशासाठी रंगभूमीचा वापर करु नका तर बौद्धिकदृष्टय़ा रंगभूमी सशक्त करा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले.

जागतिक रंगकर्मी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद आणि मराठी नाटय़ कलाकार संघातर्फे ज्येष्ठ अभिनेते रंगकर्मी विक्रम गोखले यांचा सन्मान ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मराठी नाटय़ कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे, उपाध्यक्ष शरद पोंक्षे आदी मान्यवर उपस्थित होते. त्याकेळी विक्रम गोखले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा कार्यक्रम रविवारी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिर येथे पार पाडला.

विक्रम गोखले म्हणाले, 10 जानेवारी 2016 हा माझ्या आयुष्यातील अत्यंत दुःखद दिवस. माझ्या आवाजामुळे मला रंगभूमीचा निरोप घ्यावा लागला. मी हा निरोप शरीराने घेतला, पण माझे मन आणि हृदयाने मी या रंगभूमीमध्ये आजही गुंतलेला आहे. ते पुढे म्हणाले, रंगभूमी कलाकार हा नेहमीच विद्यार्थीदशेत असतो. रंगभूमी कलाकारातील अभिनय आणखी खुलवण्यासाठी प्रयोगातून संधी देत असते. त्यामुळे कलाकारांनी या रंगभूमीकडे कधीच पाठ फिरकू नये, असे आवाहन विक्रम गोखले यांनी केले. पुरस्कार सोहळय़ानंतर अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी विक्रम गोखले यांची मुलाखत घेतली. तसेच जयंत सावरकर यांनी पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील अंतु बर्वा साकारला.

मृत्युपत्रात बॅकस्टेज आर्टिस्टसाठी तरतूद
विक्रम गोखले म्हणाले, माझ्या मृत्युपत्रात माझे कर्तव्य म्हणून बॅक स्टेज आर्टिस्ट आणि मराठी नाटय़ कलाकारांसाठी तरतूद करून ठेवणार आहे. त्यांनी प्रत्येकी 11 हजार बॅकस्टेज आर्टिस्ट आणि मराठी नाटय़ कलाकार संघ यांना दिले. प्रत्येक कलाकाराने त्यांची वर्षातील एक नाइटचे पैसे बॅक स्टेज आर्टिस्ट आणि कलाकार संघासाठी द्यावे, असे आवाहन केले.