मैदाने-उद्यानांचे भूखंड मुंबईकरांसाठी राखीवच ठेवणार, शिवसेनेची ठाम भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मैदाने-उद्यानांसाठी आरक्षित असणारे भूखंड मुंबईकरांसाठी राखीवच ठेवणार अशी ठाम भूमिका घेत कुर्ल्यातील भूखंड पालिका ताब्यात घेणार असल्याचे आज शिवसेनेने जाहीर केले. याबाबत महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांच्या सूचनेनुसार सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आयुक्त अजोय मेहता यांना पत्रही दिले आहे. त्यामुळे हा भूखंड लवकरच पालिकेच्या ताब्यात येणार आहे. यामुळे भूखंड ताब्यात घेण्यावरून राजकारण करणारे विरोधक चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

कुर्ला काजूपाडा, मौजे कुर्ला-2 येथील मैदानासाठी आरक्षित असणारा भूखंड सुधार समितीत मंजूर झाला होता, मात्र गुरुवारी झालेल्या पालिकेच्या महासभेत दफ्तरी दाखल करण्यात आला. यावरून विरोधकांनी राजकारण करीत शिवसेना हा भूखंड बिल्डरच्या घशात घालीत असल्याचा आरोप करून राजकारण करण्यास सुरुवात केली. स्थायी समितीत फलकबाजी करून शिवसेनेवर आरोप केले. मात्र शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करताना मुंबईतील उद्याने, मैदानांसाठी आरक्षित भूखंड पालिकेच्या माध्यमातून ताब्यात घेऊन तातडीने विकसित करणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर ‘एल-विभाग’ कुर्ला येथील उद्यानाकरिता आरक्षित असलेल्या भूखंडाचा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला असता तरी मुंबईकरांसाठी हा प्रस्ताव पुन्हा सभागृहात सादर करण्याची मागणी आयुक्तांकडे केल्याचे सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी सांगितले.

असे आहे प्रकरण
मौजे कुर्ला-2 मधील सुमारे चार कोटी रुपयांचा भूखंड क्र. 16, 28 आणि 29 उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आला आहे, मात्र सध्या या भूखंडावर सध्या 100 टक्के अतिक्रमण झाले असल्याने विकासाचा प्रश्न आहे. शिवाय स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारींमुळे हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करावा अशी उपसूचना सुधार समितीचे माजी अध्यक्ष अनंत नर यांनी मांडली. ही उपसूचना बहुमताने मंजूर झाल्यामुळे प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला, मात्र मुंबईकरांच्या हितासाठी हा भूखंड पालिका लवकरच ताब्यात घेणार असल्याचे शिवसेनेने आज जाहीर केले.

महापौर लवकरच महासभेत प्रस्ताव आणणार
प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला असला तरी सदर प्रस्ताव पालिकेच्या महासभेत पुन्हा मांडण्यासाठी आयुक्तांशी चर्चा केल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. आयुक्त अजोय मेहता यांनीदेखील संबंधित भूखंड ताब्यात घेण्यासाठी लवकरच महासभेत पुन्हा प्रस्ताव मांडण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सदर प्रस्ताव अनावधानाने दफ्तरी दाखल करण्यात आला असला तरी हा भूखंड मैदानासाठीच राखीव राहील, असेही जाधव म्हणाले.

मुंबईकरांना मैदाने, उद्याने मिळावीत अशीच शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पाठपुराव्यातून मुंबईभरात शेकडो अत्याधुनिक उद्याने-मैदाने विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे कुर्ल्यातील मैदानासाठी आरक्षित असणारा भूखंडही पालिका ताब्यात घेईल. – प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर,