
सामना प्रतिनिधी । मुंबई
नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलमधील व्यापाऱयांवर पाळत ठेवून त्यांना लुटण्यासाठी जबरी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या छोटा शकील गँगच्या चौघा दरोडेखोरांना नागपाडा पोलिसांनी वेळीच उचलल्याने मोठी घटना टळली. मात्र एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सिटी सेंटर मॉलमधील काही व्यापारी सायंकाळच्या सुमारास दुकान बंद केल्यानंतर पैसे घेऊन निघून जातात. ही बाब हेरून पाच दरोडेखोरांनी त्यांना लुटण्याचा कट रचला होता. नेमकी ही बाब नागपाडा पोलिसांना समजली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण, एपीआय संदेश मांजरेकर, उपनिरीक्षक रामदास कदम, रूपेश पाटील व पथकाने परिसरात सापळा रचला. दरोडेखोर हे मुंबई सेंट्रल येथील बीआयटी चाळ येथे येणार असल्याचे कळताच रविवारी सायंकाळी पोलीस पथकाने त्यांच्यावर झडप घातली. मात्र या वेळी झालेल्या झटापटीचा फायदा घेत एक दरोडेखोर तेथून निसटला. ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा, दोन चॉपर, एक खेळण्यातली पिस्टल, मिरची पूड, मोटरसायकल असे साहित्य मिळून आले. तसेच या प्रकरणी केलेल्या तपासात या आरोपींनी मुंबई व ठाणेमधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, हत्यार बाळगणे, चोरी, घरफोडी यासारखे गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली.


























































