भाजपकडून जळगावकरांसाठी ‘बुरे दिन’ची खबर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरत काळे । जळगाव

सत्ता आल्यावर नागरिकांना अच्छे दिनची स्वप्ने दाखवण्याऱ्या भाजपने घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली सामान्य नागरिकांकडून अतिरिक्त कर वसूल करण्याचा ठराव संमत केला आहे. आधीच सोयी सुविधा देण्यात अपयशी असल्याने मनपाने सामान्य नागरिकांवर अजून बोजा टाकू नये यासाठी शिवसेनेने या ठरावाला तीव्र विरोध केला आहे.

महानगरपालिकेची महासभा महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली मनपात सुरू आहे. यात विषय क्र. 6 मध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मनपा हद्दीतील नागरिकांकडून सेवा शुल्क वसूल करण्यात यावे असा प्रस्ताव प्रशासनाकडून आला आहे. सत्ताधारी भाजपने या ठरावास पाठिंबा दिला आहे. यावर शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला. सामान्य जलगावकर मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सफाई पोटी आधीच आपण कर घेत आहोत. पुन्हा हा कर लादून सर्वसामान्यांना वेठीस धरू नका, असे शिवसेना नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी सभागृहात सांगितले.

शिवसेनेचे विरोधी पक्षनेते डॉ. सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, नगरसेवक विष्णू भंगाळे यांचेसह शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी या ठरवास प्रखर विरोध दर्शविला. शिवसेनेच्या विरोधामुळे सत्ताधारी भाजप सदस्यांनी देखील चर्चा करायला सुरुवात केली. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. शेवटी बहुमताच्या जोरावर भाजपने शासनाच्या नियमाच्या आड लपून नागरिकांवर कराचा बोजा टाकण्याचा घाट घातला आहे. यामुळे भाजपाला सत्ता देऊन अच्छे दिन तर दूरच आहे ते दिवस देखील ‘बुरे दिन’ होतील की काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित राहत आहे.