राम मंदिर अजून होत नाही; 56 इंचांची छाती गेली कुठे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, डोंबिवली

डोंबिवलीच्या अप्पा दातार चौकात विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विहिंपचे कल्याण जिल्हाध्यक्ष विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रखर अभिमान आहे. मराठा ही जात नाही तर तलवारीचं टोक आहे. न्यायालयाला दहीहंडीची उंची किती असावी हे ठरवायला वेळ आहे, पण राममंदिराचा 500 वर्षांचा प्रश्न सोडवायला वेळ नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने देशवासीयांना अनेक आश्वासने दिली. मात्र विकास सोडाच.. राममंदिरही उभे राहिले नाही. दीड दमडीचा हैद्राबादी आम्हाला आव्हान देतो. 56 इंचांची छाती गेली कुठे, असा जोरदार टोला विहिंपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. देशाला आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या लोहपुरुषाची गरज असल्याचेही ठणकावून सांगण्यात आले आहे.

हिंदू अपंग नाहीत!
हिंदू समाज अपंग नाही. आता बंधन तोडून राममंदिर बनवण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी परखडपणे सांगितले. याप्रसंगी विविध वक्त्यांनी आपले विचार मांडत सरकारवर टीका केली. राममंदिर होण्यासाठी संसदेत कायदा करावा, अशी मागणी करावी लागते हेच मनाला पटण्यासारखे नाही, असा संतापही यावेळी व्यक्त करण्यात आला.