
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हळुहळू स्पष्ट होत आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप भूईसपाट होताना दिसत असून काँग्रेसचा ‘हात’ उंचावला आहे. मध्यप्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये तुल्यबळ लढत होताना दिसत आहे. कधी भाजप आघाडीवर तर कधी काँग्रेस अशी स्थिती दिसत आहे. दोन्ही पैकी कोणताही पक्ष स्पष्ट बहुमताकडे जाताना दिसत नाहीय. अशातच बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. फोडाफोडीचा संभाव्य धोका लक्षात घेता मायवती यांनी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमधील नवनिर्वाचित आमदारांना दिल्लीत बोलावलं आहे.
मध्यप्रदेशात भाजप-काँग्रेसचे सी-सॉ, बसप ठरणार ”किंगमेकर”
मध्यप्रदेशात गेल्या 15 वर्षापासून भाजपची एकहाती सत्ता राहिली आहे. मध्यप्रदेश हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. आरएसएसचे हायकमांड ऑफिस नागपूरला असले तरी मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक प्रवाभ राहिल्याचे दिसून आले आहे. परंतु याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये येथे काँटे की टक्कर होताना दिसत आहे. दोन्ही पक्ष बहुमताच्या जवळ असले तरी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे मायावती या किंगमेकरच्या भूमिकेत दिसत असून त्यांच्या पक्षाने महत्त्वपूर्ण अशा पाच जागांवर आघाडी घेतली आहे. मायावती यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपला साथ देणार नसल्याचे म्हटले आहे. सध्या काँग्रेस 114 तर भाजप 106 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस बसपा व इतर पक्ष मिळून मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेसाठी डाव मांडण्याची शक्यता आहे. ही गणितं जर जुळून आली तर भाजपाला जबरदस्त धक्का बसणार आहे.




























































