मोदी लाट ओसरली…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-in-tension

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी लाट ओसरल्याचे स्पष्ट झाले असून हा मोदींसाठी सर्वात मोठा झटका मानला जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून मानल्या जाणाऱया पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपला पुरते पाणी पाजले. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकांसाठी भाजपला ठोस आणि मजबूत रणनीती आखावी लागणार आहे.

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर काय घडले ?
– 13 सप्टेंबर 2013 रोजी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. या बैठकीला पंतप्रधानपदाचे दावेदार लालकृष्ण आडवाणी मात्र हजर नव्हते. त्यांनी त्यावेळचे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या कामकाजावर बोट ठेवले आणि प्रसारमाध्यमांना याबाबत असंतोष व्यक्त करणारे पत्र लिहिले होते.

– ‘काँग्रेसमुक्त हिंदुस्थान’ असा नारा देणाऱया नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी झारखंड, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजप सरकार होते तर नागालँड, पंजाब आणि आंध्र प्रदेशात सहकारी पक्षाचे सरकार होते.

– मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी अरुणाचल प्रदेश, आसाम, हरयाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम आाणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र दिल्ली, राजस्थान आणि आंध्र प्रदेशात काँग्रेसने सत्ता गमावली होती. महाराष्ट्र आणि हरयाणातही काँग्रेसचे पानिपत झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात काँग्रेसचा दुसऱयांचा पराभव झाला.

2014 ते 2018 भाजपची हवा

– 2014 – हरयाणात आणि महाराष्ट्रात भाजपने काँग्रेसला हरवले.

– 2015 – नवी दिल्लीत ‘आप’चे दुसऱयांदा सरकार बनले. काँग्रेस-भाजपला जनतेने साफ नाकारले.
– 2016- आसाममध्ये 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसचा भाजपने पराभव केला. केरळमध्ये डाव्यांनी सत्ता काबीज केली. पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस सत्तेवर आले तर तामीळनाडूमध्ये अण्णा द्रमुक सत्तेवर आली आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सत्ता काबीज केली.
– 2017-गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्ये भाजपने सत्ता मिळवली.
– 2018-त्रिपुरात भाजपने सत्ता काबीज केली. मेघालयात एनपीपीने भाजपसोबत युती करून सरकार बनवले, नागालँडमध्ये भाजपने विरोधी पक्षांशी आघाडी करून सरकार बनवले.

2018 मध्ये मोठा झटका
– साडेचार वर्षे काँग्रेसला थेट टक्कर देऊन एकहाती सत्ता मिळवल्यामुळे नरेंद्र मोदी यांची अजेय नेता अशी प्रतिमा झाली होती. मात्र ज्या पाच राज्यांमध्ये भाजप दीड दशकापासून ठाण मांडून होती तो गड काँग्रेसने भेदला आणि मोदींच्या प्रतिमेला तडे गेले.

– 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आता भाजपासाठी कडवे आव्हान आहे.

– 16 डिसेंबर 2017 रोजी राहुल गांधी यांनी पक्षाची कमान सांभाळल्यानंतरचा हा विजय असल्याने काँग्रेससाठी हा विजय खास आहे.

भाजपचा विजयी रथ रोखला
भाजपचा विजयी रथ 2018 च्या विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेसने रोखला आहे. छत्तीसगडमध्ये 15 वर्षांनंतर काँग्रेसने भाजपला सत्तेबाहेर ढकलले आहे.

सध्या या राज्यांमध्ये भाजपा, एनडीए सरकार
त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, हरयाणा, झारखंड़, महाराष्ट्र, आसाम आणि अरुणाचल प्रदेश. तर बिहार आणि सिक्कीम या राज्यांमध्ये एनडीए सरकारची सत्ता आहे.