
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्य प्रदेशातील मतमोजणी तब्बल 24 तासांनंतर पूर्ण झाली असून यामध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मात्र असे असले तरी बहुमतचा आकडा मात्र त्यांना गाठता आला नाही. मॅजिक फिगरपासून ते अवघे दोन आकडे दूर आहेत. पण हे दोनचं अंतर पार करण्यासाठी मध्य प्रदेशात ‘घोडेबाजाराला’ ऊत येईल.
पाच राज्यांपैकी तीन राज्यात काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे. छत्तीसगडमध्ये तर काँग्रेसने भाजपला चांगलीच धूळ चारली असून 68 जागांवर यश मिळवलं आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसने 99 जागांवर यश मिळवलं आहे. इथे देखील काँग्रेस बहुमतापासून दोन अंकांनी दूर आहे. मात्र भाजपला अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापण्यासारखं चित्र इथे दिसत नाही. कारण भाजपकडे 73 तर अपक्षांचे 27 असे मिळून देखील 101 ची मॅजिक फिगर गाठता येत नाही. त्यामुळेच काँग्रेस राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करेल यात शंका नाही.
प्रश्न आहे तो मध्य प्रदेशचा. कारण काँग्रेसला 114 तर भाजपला 109 जागा मिळाल्या आहेत. बसपकडे दोन तर अपक्षांकडे 5 जागा आहेत. बसपने भाजपसोबत जाणार नाही, असे जरी सांगितले असले तरी काँग्रेसला साथ देण्याबद्दल सांगितलेले नाही. त्यामुळे मध्य प्रदेशात प्रचंड घोडेबाजाराची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
























































