अख्खी माथेरानची राणी फक्त 95 हजारांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
matheran-new

सामना प्रतिनिधी । मुंबई

माथेरानच्या राणीचा दार्जिलिंग रेल्वेच्या धर्तीवर विकास करण्याचा ठाण मांडलेल्या मध्य रेल्वेने आता या मिनी ट्रेनला फॅमिली पिकनिक किंवा बर्थ डे तसेच पार्टीसाठी बुक करण्याची संधी उपलब्ध केली आहे. ही संपूर्ण ट्रेन आता आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून 95 हजारांत बुक करता येणार आहे. या गाडीला तीन सेकंड क्लास तर एक फर्स्ट क्लासचा डबा असून गाडीची एकूण क्षमता 100 प्रवाशांची आहे.

सकाळी नेरळ ते माथेरान धावणाऱया माथेरानच्या राणीला वातानुकूलित डबा बसविल्यानंतर तिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. केवळ तीनच दिवसांत माथेरानच्या मिनी ट्रेनला एका वातानुकूलित डब्यामुळे तीस हजार रुपयांची कमाई झाली. आता सुट्टीच्या दिवशी विकेण्डला एखाद्याला फॅमिली सेलिब्रेशन करायचे असेल तर चार्टर्ड ट्रेन म्हणून तिला खासगी तत्त्वावर बुक करता येणार आहे. त्यासाठी 95 हजार रुपये भाडे निश्चित केले असून त्या मोबदल्यात चहा व नाश्ता अशा सुविधा मिळणार नसल्याचे आयआरसीटीसीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सकाळी ही ट्रेन नेरळहून निघेल आणि सायंकाळी परतीचा प्रवास या ट्रेनने करता येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

माथेरानच्या राणीच्या नेरळ ते माथेरान अशा थेट फेऱयांची संख्या नुकतीच सहा करण्यात आली आहे. त्यातील दोन फेऱयांना एसीचा एक डबा जोडण्यात आला आहे. तर अमन लॉज ते माथेरान शटल फेऱयांची संख्या सोळा करण्यात आली आहे. एसी डब्याच्या अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी 1-1 फेरी करण्यात येणार आहे. या एसी कोचसाठी प्रवाशांना 415 रुपये मोजावे लागत आहेत.