
सामना प्रतिनिधी। नेवासा
नेवासा फाटा येथे बुधवारी पहाटे ६ च्या सुमारास नगरहून संभाजीनगरच्या दिशेने जाणारा टेम्पो हॉटेल गुरुदत्त मध्ये घुसल्याने एक जण गंभीर जखमी झाला तर हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशी माहिती हॉटेल मालक दत्तात्रय किसन शिंदे यांनी सांगितले.
नेवासा फाटा येथील हॉटेल गुरुदत्त मध्ये सकाळी सहाच्या सुमारास बजाज कंपनीचे स्पेअर पार्ट घेऊन जात असणाऱ्या टेम्पोला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे टेम्पो हॉटेलमध्ये घुसल्याने हा अपघात झाला. यात हॉटेलमध्ये चहा पीत असणारे नाना उत्तम ऊदरभरे (56) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे दाखल करण्यात आले. प्रथम उपचार करून त्यांना नगर येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.






























































