
>>साहेबराव निसळ<<
संत गाडगेबाबा हे विलक्षण कर्मयोगी सत्पुरुष होते. साधू वा संत कसा सत्यनिष्ठ, निर्भय, निःस्पृह, सर्वांवर प्रेम करणारा असतो याचे प्रारूप म्हणजे बाबांचे जीवन होय. आज फलज्योतिषांचे व यांत्रिक, परंतु खर्चिक कर्मकांडाचे प्राबल्य वाढत आहे. अशा काळात तरुण–तरुणींनी अशी चरित्रं जरूर वाचावीत व त्यांचे मनन करावे. दुबळय़ा मनांत शक्ती देण्याचे कार्य अशी चरित्रं करतात.
महाराष्ट्रात अनेक साधूसंत, धर्मसुधारक व समाजसुधारक होऊन गेले. त्यांच्यात आधुनिक काळातील गाडगेबाबा हे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होय. त्यांच्या हातात एक गाडगे व अंगावर गोधडी असे. म्हणून त्यांना गाडगेबाबा वा गोधडीबाबा म्हणून लोक ओळखू लागले. त्यांचे मूळ नाव डेबूजी. अर्थात डेबूजी झिंगराजी सोनवणे. त्यांचा जन्म कोते गावी, ता. अमरावती येथे झाला होता. लहानपणीच झिंगराजींचे निधन झाले. डेबूजी व आई सखूबाई मामाच्या गावी आले. त्यांची स्वतःची जमीन सावकाराने हडप केलेली होती. डेबूजी मामाच्या शेतात काम करू लागला. त्याला भजनाचेही वेड होते. डेबूजी साधारणतः 29 वर्षांचा असेल. त्याला एक विचित्र साधू भेटला. त्याच्या हातात ज्वारीची कणसे होती. डेबूजीने साधूला विचारले. ‘‘महाराज! आपल्याला काही हवे काय?’’ साधू हिंदी भाषेत म्हणाला, ‘‘मुझे कुछ नहीं चाहिए। तुम चलोगे मेरे साथ?’’
डेबूजी साधूच्या पाठोपाठ नदीकाठी आला. डेबूजीने साधूस भोजनाचा आग्रह केला व गावात जाऊन त्याने भोजनाची साधनसामग्री आणली. साधून सर्व सामान एकत्र केले व तळून काढले. दोघांनी भोजन केले व दोघेही शेजारच्या महादेवाच्या मंदिरात दिवसभर एकत्र बसले. संध्याकाळी डेबूजी घरी आला. आजोबांनी त्याला दर्यापूरला पाठवले. साधूही दर्यापूरला आला. साधूने डेबूजीस ‘देवीदास’ असे नाव ठेवले. दर्यापूरच्या लोकांनी विचित्र वेषधारी साधूस गावातून हाकलून दिले. तो कुठे गेला त्याचा पत्ता डेबूजीलाही लागला नाही.
इकडे डेबूजीने घरदार सोडण्याचा निर्णय घेतला. डेबूजीने चांगले कपडे फेकून दिले. फाटका शर्ट घातला व फाटके – तुटके धोतर नेसले, अंगणातून एक काठी व मडके घेतले व डेबूजीने घरदार सोडले. पुढील 12 वर्षे डेबूजी रानी-वनी हिंडला. 12 वर्षांच्या भटकंतीमुळे त्याने गावातील व तीर्थक्षेत्रातील अस्वच्छता, अज्ञान बघितले. भयानक जातीभेद पाहिला. वाईट रूढींचे त्याला दर्शन झाले. लोकांच्या जमिनी लुटणारे धूर्त व क्रूर सावकारही बघितले. अनेकदा त्यास मारही खावा लागला. त्याने अनेक कीर्तनेही ऐकली होती. त्यांची प्रज्ञा जबरदस्त होती. 12 वर्षांच्या काळात त्यांनी तपश्चर्या केली व ते अनुभवसंपन्नही झाले. संत तुकाराम महाराजांचे अनेक अभंग त्यांना मुखपाठ होते. संत कबीरांविषयीसुद्धा त्यांना चांगली माहिती होती. त्यांचा उपदेश सरळ-सोपा होता. देवाचे भजन करा, कर्ज काढून तीर्थयात्रा करू नका, ईश्वर हा मंदिरांपेक्षा घाम गाळणाऱ्यांबरोबर असतो. शरीराचे फार लाड करू नका. आपल्या गुराढोरांची चिंता करा. मुलांना शिक्षण द्या. देवदेवतांना कोंबडय़ा-बकरे मारू नका. हुंडा मागू नका. दारू पिऊ नका. शिवाशिव वाईट आहे. कोणत्याही गावात गेले की बाबा सकाळी झाडू घेऊन गल्लीबोळात झाडू मारीत आणि रात्री मंदिरासमोर कीर्तन करीत. त्यांचे कीर्तन म्हणजे लोकशिक्षणाचे फिरते विद्यापीठच होते. हे सर्व करीत असताना ते पूर्णपणे अपरिग्रही राहिले.
त्यांनी अनेक धर्मशाळा बांधल्या. पहिली धर्मशाळा त्यांनी पंढरपूर येथे बांधली. स्वतःच्या व्यवहारात बाबा फार काटकसरीने वागत. मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधून त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांची सोय करविली. बाबांची पत्रेसुद्धा फार उद्बोधक व मननीय आहेत. त्यांच्या मुलीचे नाव आलोकाबाई होते. त्यांनी आपल्या मुलीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात आलोकाबाईंना खडसावताना ते लिहितात-
‘‘तुला पैशाचे भूत लागले आहे. ज्याला पैशाचे भूत लागते, तो माणूस पोटालासुद्धा कमी खातो. साधूच्या घरची माणसे उदार हवीत. कबीरांनी अंतकाली आपला मुलगा कमाल यास एक दोहा सुनावला ः
कबीर कहे कमाल को दो बाते लिख ले।
कर साहेबकी (देवाची) बंदगी और भुकेकु कुछ दे।।
बाबाची मुलगी म्हणून कोणाकडेही काही मागू नकोस. मागितले तरी कोणी तिला काही देऊ नये.’’
श्रमनिष्ठा व औदार्य, तेजस्विता व सर्वांविषयी आत्मीयता हे गुण गाडगे बाबांनी अंगिकारले होते. व्यवहार व कीर्तन यांच्याद्वारे बाबा त्यांचे महत्त्व सर्वांना पटवून देत असत.
बाबा स्वतः निरक्षर होते. असे असूनही त्यांनी लोकशिक्षक या नात्याने महान कार्य केले. शिक्षण हे व्यवहार व परमार्थासाठीही आवश्यक आहे. जादूटोणा, फलज्योतिष व चमत्कार यांचाही ते खरपूस समाचार घेत असत. ते म्हणतात, मूठ मारून माणसे मारता आली असती तर इंग्रजांनी बंदुका, तोफा बनविल्या असत्या का?
गाडगे बाबांची कीर्ती गांधीजींपर्यंत पोहोचली. गांधीजींनी नामदार खेरांकडे बाबांना भेटण्याची इच्छा प्रगट केली. बाबांचे खेरसाहेबांशी चांगले संबंध होते. बाबा वर्ध्याच्या आसपासच्या खेडय़ात कीर्तनासाठी आलेले आहेत असे कळताच खेर यांनी बाबांना वर्ध्याला बोलावून घेतले. बाबा वर्ध्याला येताच बाबांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली. गांधीजींनाही फार आश्चर्य वाटले. बाबा खुर्चीवर वा आसनावर न बसता जमिनीवरच बसले. गांधीजींच्या आग्रहावरून बाबांनी वर्ध्याला कीर्तनही केले. बाबांच्या निःस्पृहतेमुळे व त्यांच्या सत्कार्यामुळे सरकारदरबारीही त्यांचे वजन होते. गाडगेबाबांचे अखेरचे कीर्तन 8 नोव्हेंबर 1956 रोजी वांद्रे (मुंबई) येथे झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर 13 दिवसांनी म्हणजे 19 डिसेंबर 1956 रोजी बाबांनी अमरावतीमध्ये शेवटचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी अमरावती विद्यापीठास कै. गाडगेबाबांचे नाव देण्यात आले. असा हा विलक्षण कर्मयोगी सत्पुरुष होता. साधू वा संत कसा सत्यनिष्ठ, निर्भय, निःस्पृह, सर्वांवर प्रेम करणारा असतो याचे प्रारूप म्हणजे बाबांचे जीवन होय. आज फलज्योतिषांचे व यांत्रिक, परंतु खर्चिक कर्मकांडाचे प्राबल्य वाढत आहे. अशा काळात तरुण-तरुणींनी अशी चरित्रं जरूर वाचावीत व त्यांचे मनन करावे. दुबळय़ा मनांत शक्ती देण्याचे कार्य अशी चरित्रं करतात.






























































