
सामना प्रतिनिधी, मुंबई
अवघ्या काही तासांमध्ये साईंच्या दरबारात पोहोचून दर्शन घेण्यासाठी आतुर झालेल्या साईभक्तांवर काळाने घाला घातल्यामुळे कांदिवलीच्या समतानगरमध्ये आक्रोश, हळहळ व्यक्त होत आहे. सिन्नरमध्ये भरधाव कार पायी दिंडीत घुसल्याने झालेल्या या अपघातात मृत्युमुखी पडलेले चारही कर्ते तरुण असल्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. दरम्यान, या अपघातामधील जखमींवर नाशिकमध्ये उपचार सुरू असून आठ जण अतिदक्षता विभागात आहेत.
समतानगरमधील साई मंदिरातून कांदिवली, बोरिवली, मालाडसह सुमारे बारा मंडळांतील 250 साईभक्त सहभागी झाले होते. गेल्या 13 वर्षांपासून नियमितपणे निघणाऱया या पालखीमध्ये मुंबईच्या विविध भागांतील साईभक्तही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. 15 डिसेंबर रोजी मोठय़ा भक्तिभावाने साईनामाचा गजर करीत ही पालखी निघाली. मात्र भरधाव कार या दिंडीत घुसल्याने एकच हाहाकार उडाला. आठव्या आणि दत्तजयंती दिवशीच हा अपघात झाला. अपघातात 20 ते 22 जणांना कारने चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्घटनेतील जखमींवर सिन्नर रुग्णालय, नाशिकचे शताब्दी रुग्णालय आणि साई संस्थानच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी चारही मृतदेह मुंबईत आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबाचा एकमेव आधारच गेला
या अपघातात मृत्युमुखी पडलेला 18 वर्षीय अनिकेत म्हेत्रे हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करायचा. त्याला आईवडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. भाऊ नववीत तर बहीण सातवीत शिकत आहे. त्याला व्यवसायात वडिलांचीही मदत व्हायची, मात्र त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा आधारच गेला आहे.
चार महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
अपघातात मृत पावलेल्या मंगेश पळसपगार याचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आईवडील असा परिवार आहे. दररोज छोटी-मोठी कामे करून कुटुंब चालवणारा मंगेश काँग्रेसचा कार्यकर्ता होता, असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
शिवसेना मदतीला धावली
अपघाताची माहिती मिळताच कांदिवली येथून शिवसेनेच्या वतीने एक बस, रुग्णवाहिका आणि मदतीसाठी कर्मचारी पाठवण्यात आले. शिवाय अपघातामधील जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी नाशिकमधील रुग्णालये आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून कार्यवाही करण्यात आल्याचे शिवसेनेचे योगेश भोईर यांनी सांगितले.
दारुडय़ा ड्रायव्हरनेच घेतले बळी
पायी दिंडीत घुसलेली स्विफ्ट कार ही नाशिकमधील एका वकिलाची असल्याचे समजते. मात्र अपघाताप्रसंगी ड्रायव्हरव्यतिरिक्त गाडीत कुणीही नव्हते. अपघातानंतर हा ड्रायव्हर साईभक्तांशी हुज्जत घालत होता असे प्रत्यक्षदर्शी साईभक्तांकडून सांगण्यात आले. यावेळी त्याच्या हातात दारूची बाटलीदेखील होती. शिवाय त्याच्या गाडीमध्येही दारूच्या बाटल्या बघितल्याचे सांगण्यात आले.
मृतांची नावे
अनिकेत म्हेत्रे (18), कांदिवली
मंगेश पळसपगार (30) कांदिवली
ऍण्ड्रय़ू, मढ, मालाड
अविनाश पवार, भाईंदर





























































