वेंगुर्लेत रंगला ‘जागर मालवणीचो’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

बॅ नाथ पै सेवांगण संचलित मालवणी बोली संरक्षण, संवर्धन आणि संशोधन केंद्र, तसेच मुक्तांगण व परुळेकर दत्त मंदिर, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर मालवणीचो’ कार्यक्रम वेंगुर्ले मुक्तांगण येथे उत्साहात संपन्न झाला. दोन दिवस रंगलेल्या या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मालवणी एकपात्री अभिनय स्पर्धा व लेखक डॉ. नामदेव गवळी यांची प्रकट मुलाखत विशेष रंगली. तर जिल्ह्यातील मालवणी कवींच्या संमेलनात मालवणी बोलीतील कवितांच्या पावसात रसिक न्हाऊन गेले.

या कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी २२ डिसेंबर रोजी कुमामे येथील सहदेव कुंभार व सहकारी यांनी सादर केलेल्या धनगरी नृत्याने झाली. हे नृत्य सूफी नृत्याची आठवण करून देत होते. त्यानंतर वऱ्हाड येथील श्रीधर गोंधळी व सहकारी यांनी गोंधळातून सादर केलेली अत्री ऋषी, अनसूया व दत्तात्रय यांची कथा रसिकांची दाद मिळवून गेली. सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाल्यानंतर शालेय मुलांची मालवणी एकपात्री अभिनय स्पर्धा रंगली.

तर रविवार २३ रोजी डॉ. नामदेव गवळी यांची प्रकट मुलाखत व मालवणी कवी संमेलन रंगले. प्रारंभी बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात श्री. मनोहर परब यांनी मालवणी बोलीची मौखिक गीतें व जती श्रोत्यांसमोर उलगडली. ‘भातालय’कार प्रा. डॉ. नामदेव गवळी यांची प्रकट मुलाखत विरधवल परब आणि विठ्ठल कदम यांनी घेतली. मालवणी बोलीच्या प्रचार व प्रसार यांसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, अशी भूमिका डॉ. नामदेव गवळी यांनी मांडली. भातालय या त्यांच्या काव्य संग्रहातील खेळे, दृष्ट या कविता उपस्थितांची दाद मिळवून गेल्या. बॅ नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परूळेकर यांच्या हस्ते डॉ. गवळी यांचा शाल, श्रीफळ, ‘ज्ञानेश्वरी’, ‘नामा म्हणे’ हे ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रात निमंत्रित मालवणी कवींचे कवीसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात दादा मडकईकर, रूजारिओ (बाबला) पिंटो, कल्पना बांदेकर, डॉ. बापू भोगटे, विनय सौदागर, सुनंदा कांबळे, चारुशीला देउलकर, नितीन वाळके, देवेंद्र गावडे, विठ्ठल कदम, भूषण मेतर, मनोहर परब आदी सहभागी झाले होते. पाऊस, आपले गाव व इतर सामाजिक विषयांवर मालवणी बोलीतून सादर झालेल्या भावनाप्रधान, गंभीर तसेच रंजक, विनोदी कवितांच्या पावसात श्रोते मनमुराद भिजले. नितीन वाळके यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

यावेळी मुक्तांगणच्या पालकांनी आवर्जून मालवणी बोलीतून तयार केलेले प्रकल्प मुक्तांगणच्या शिक्षिका गौरी माईणकर, निलांगी करंगुटकर, गायत्री मिशाळे व पालक प्रतिनिधी प्रितम ओगले यांनी मालवणी केंद्र प्रमुख रुजारिओ पिंटो यांच्याकडे सुपूर्द केले. मालवणी बोली संरक्षण, संवर्धन, आणि संशोधन केंद्राचा हेतू आणि पुढील वाटचाली संदर्भात मार्गदर्शन अॅड. देवदत्त परूळेकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम मालवणी बोलीतूनच करण्यात आला.