सटाण्यात 5 दिवसांआड पाणीपुरवठा, गिरणा नदी कोरडीठाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सटाणा

शहरासह तालुक्यातील सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक उग्र झाला आहे. डिसेंबरमध्ये शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. आताच ही भीषण अवस्था असताना जानेवारीपासून पाणीटंचाई अधिक उग्र रूप धारण करेल अशी परिस्थिती दिसू लागली आहे.

सटाणा शहरात आजमितीस 5 दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे गिरणा नदी पात्र कोरडेठाक झाल्याने आता 5 दिवसांआड होणारा नळ पाणीपुरवठा आता 10 ते 12 दिवसांआड होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे येत्या नववर्षाच्या सुरुवातीला शहरातील जनतेला पाणीटंचाईचे स्वागत करावे लागणार आहे.

1 जानेवारी 2019 पासून शहरातील देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव सुरू होत आहे. या काळात शहरात हजारो भाविक दाखल होत असतात. संपूर्ण राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. यामुळे पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांच्या पाण्यात कपात करण्यात येत असली तरीही या काळात पाण्याचे ट्रँकर सुरू करण्याचे अभिवचन पालिका प्रशासनाने दिले आहे.

गेल्या पावसाळ्यात तालुक्यात 460 मिमी या सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. परिणामी तालुक्यातील नदी, नाले, कोरडेठाक झाले आहेत. पाऊस नसल्याने शेतातील विहिरीदेखील आटल्या आहेत. यामुळे शेती पिकांना पाणी नाहीतर नाही, जनावरांसाठीदेखील पिण्याच्या पाण्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. तालुक्यातदेखील आजमितीस 9 गावे व वाडय़ामध्ये 9 ट्रँकर सुरू केलेले आहेत. ट्रँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असला तरीही पाण्याचे नियोजन करावे अशी मागणी होत आहे. तालुक्यातील केळझर व हरणबरी धरणातील पाण्याचे आवर्तन पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. शेती सिंचनासाठी पाणी मिळणार नसल्याने शेतीचा प्रश्न बिकट होणार आहे.