
राजेश देशमाने । बुलढाणा
मागील वर्षी शेतकर्यांनी विकलेल्या उडीद, मुग, हरभरा व तुरीचे पैसे अद्यापही शेतकर्यांना मिळाले नाहीत. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी निवेदने देऊन, आंदोलन करून हा प्रश्न लावून धरला, मात्र मुर्दाड प्रशासनाला शेतकर्यांचा हा आवाज ऐकायला आला नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी चिखली जिनिंग प्रेसिंगचे कार्यालयावर धडक देत कार्यालय पेटवून दिले. त्यामुळे चिखलीत एकच खळबळ उडाली. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
नाफेडची सब एजन्सी म्हणून चिखली जिनिंग प्रेसिंगची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशन व विदर्भ मार्वेâटींग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे शेतकर्यांचे उडीद, मुग, तुर, हरभरा खरेदी करण्यात आले होते. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिण्यात विकलेल्या उडीदाचे पैसे अजूनही शेतकर्यांना मिळाले नाहीत. तर मागील मार्च महिण्यातील खरेदी केलेल्या तुरीचे व हरभर्याचे पैसे सुध्दा अद्याप शेतकर्यांना मिळाले नाहीत. हा पैसा देण्यास चिखली जिनिंग प्रेसिेंग एक वर्षापासून चालढकल करीत आहेत. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी प्रशासनाला निवेदने देवून तसेच आंदोलने करून सुध्दा प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. या उलट पैसे न देता ‘तुमचा माल घेवून जा’ अशा शेतकर्यांना धमक्या देत होते. ज्या शेतकर्यांनी आपला माल घेवून गेले. त्यांना सुध्दा चांगला माल घेवून निकृष्ट दर्जाचा माल दिला. त्यामुळे शेतकर्यांचा आक्रोश वाढला होता. याशिवाय तुरीची नोंदणी करून सुध्दा ऑनलाईन ऑफलाईनच्या घोळामध्ये माल घेतला नाही.
अनुदान देण्याचे शासनाने कबुल केले होते. मात्र तो पैसा सुध्दा शेतकर्यांना देण्यात आला नव्हता. या सर्व प्रकाराला केवळ आणि केवळ चिखली जिनिंग प्रेसिंग संस्था जबाबदार असून वरिष्ठ अधिकार्यांनी सुध्दा या संस्थेविरूध्द कोणतीही कारवाई केली नाही. अखेर शेतकर्यांचा आज चिखली जिनिंग विरूध्दाचा एवढा रोष वाढला कि, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी चिखली जिनिंग कार्यालयावर जावून कार्यालय पेटवून दिले. विशेष म्हणजे आज सकाळ पासूनच शेतकर्यांच्या प्रश्नावर जिल्ह्यात स्वाभिमानी अत्यंत आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली आहे. अनेक ठिकाणी रस्तारोको व निदर्शने करून प्रशासनाला धारेवर धरले. तीन ठिकाणी एसटी बसेसची तोडफोड सुध्दा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केली. चिखलीत मात्र कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयच पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
























































