
सामना ऑनलाईन । लखनौ
मुलीचे लग्न हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं. मात्र उत्तर प्रदेशमधील एक आई तिच्या मुलीच्या लग्नाच्या महिनाभर आधी लग्नासाठी जमवलेले पैसे आणि दागिने घेऊन तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. या प्रकरणी मुलीने पोलिसांत तक्रार नोंदविली असून तिचे दागिने व पैसे परत मिळवून देण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे.
उत्तर प्रदेशमधील आग्र्यातील जलंदा गावात ही तरुणी तिच्या आईसोबत राहते. नऊ वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झालेले. त्यामुळे तिच्या आईने लोकांची घरकामे करून त्यांचा सांभाळ केला. सदर तरुणी व तिचा भाऊ देखील कमी वयातच कामाला लागले. या तरुणीचे 30 जानेवारी रोजी लग्न होणार आहे. त्यासाठी तिने गेल्या काही वर्षांपासून पैसे साठवले होते. तसेच काही दागिने देखील तयार केलेले. सध्या घरात लग्नाची तयारी सुरू होती.
’28 डिसेंबरला दोन व्यक्ती तिच्या आईला भेटायला आल्या व नंतर आई त्यांच्यासोबत निघून गेली. मात्र नंतर ती परतलीच नाही. त्यानंतर काही वेळाने त्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती मला भेटली तेव्हा त्याने मला सांगितले की माझी आई तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. ते ऐकून मला धक्का बसला. मी आईला फोन करायचा पण प्रयत्न केला मात्र ती उचलत नाही’, असे त्या मुलीने पोलिसांना सांगितले.
























































