
सामना प्रतिनिधी । मुंबई
हा फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असे अभिमानाने सांगितले जाते. पण याच महाराष्ट्रातील सरकारला या महापुरुषांचा विसर पडला आहे. राज्य सरकारच्या सन 2019च्या कॅलेंडरमधून महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे स्मृतिदिनच गायब आहेत.
माहिती व जनसंपर्क विभागाने सर्व विभागांना नव्या कॅलेंडरचे वितरण केले. परंतु त्यात महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाचा उल्लेखच नाही. 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांचा स्मृतिदिन असतो. परंतु या कॅलेंडरमध्ये तो दिसत नाही. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स प्रतिबंधक दिन, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंधक दिन आणि 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनाचा उल्लेख आहे. परंतु त्यानंतर तीन दिवसांनी येणाऱया डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेखच नाही.
मुख्यमंत्री, माफी मागा!
विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याबद्दल सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चुकांची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, 2013 मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शासकीय पातळीवर महापुरुषांची फक्त जयंती साजरी केली जाते स्मृतिदिन नाही, असे सांगत माहिती व जनसंपर्क खात्याने हात वर केले आहेत.





























































