
सामना प्रतिनिधी, नागपूर
विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षणाची पायाभरणी खऱया अर्थाने प्राथमिक शिक्षकच करीत असतात, असे सांगतानाच मराठी टिकवायची असेल तर प्राथमिक शाळांतील शिक्षकांना सर्वाधिक पगार दिला पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी आज येथे केले. नागपूर येथे सुरू असलेल्या जागतिक मराठी नाटय़संमेलनात नाटय़दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रा. श्रीकांत तिडके यांना मुलाखत देताना ते बोलत होते.
भाषा शिक्षणाची पायाभरणी करणाऱया प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या खालोखाल पगार माध्यमिक शिक्षकांना द्यावा, असे सांगून प्रा. एलकुंचवार म्हणाले की, माध्यमिक शिक्षकांची निवड शुद्ध गुणवत्तेवर झाली पाहिजे. त्यात कोणतेही राजकारण असता कामा नये. मराठी भाषेसाठीही शासनानेच काहीतरी करावे ही अपेक्षा चुकीची आहे. आपली भाषा टिकविण्याची जबाबदारी मध्यमवर्गीयांची आणि मराठी माणसांचीच आहे, असे त्यांनी परखडपणे सुनावले.
आपण नीट मराठी बोलतो का, असा सवाल करतानाच जिथे सहजगत्या मराठी बोलू शकतो तिथेही आपण मराठी बोलत नाही. परंपरेशी आपली नाळ तुटत चालली आहे. संतवाङ्मय तसेच लोकवाङ्मयाशी आपला संबंध राहिलेला नाही असे सांगतानाच, साहित्य संमेलनासाठी दोन दोन कोटी वाटतात हे सर्व चुकीचे आहे, अशी टीका एलकुंचवार यांनी केली.
लोकांनी आपला मानसन्मान ठेवावा असे वाटत असेल तर लेखकाने आपली प्रतिष्ठा स्वत-जपली पाहिजे. राजकारण्यांच्या पुढे पुढे करतात त्यांना राजकारणी वापरून घेतात. त्यासाठी त्यांनाही दोष देता येणार नाही; कारण लेखकालाही राजकारण्यांकडून ‘पद्मश्री’, ‘जीवनगौरव’ असे बरेच काही हवे असते. लेखकाने इतकीही घाई करू नये.
‘डोहाळे जेवणा’ची गाणी लिहिणारेही होतात लेखक
लेखक होण्यासाठी साधना लागते, वाचन, मनन व चिंतन करावे लागते, वेडवाकडे जगावे लागते असे आता कोणालाच वाटत नाही. आजकाल हल्ली ‘मंगलाष्टके’ आणि ‘डोहाळे जेवणा’ची गाणी लिहिणारेही लेखक होतात. बाराखडी आली की आपण लेखक झालो असा अनेकांचा समज होतो. त्यातूनच ते लिहिते होतात, अशी खोचक टीका एलकुंचवारांनी केली. अनेकांना धड मराठी वाक्ये लिहिता येत नाहीत तेही लेखक म्हणून मिरवतात, असा टोलाही त्यांनी मारला.


























































