600 स्नायपर गनद्वारे हिंदुस्थानी जवानांना लक्ष्य करण्याचा पाकड्यांचा डाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी सैन्यातील जवानांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने सुमारे 600 स्नायपर गन विकत घेतल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे सैन्यदलाला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून हिंदुस्थानी सुरक्षा दलाला लक्ष्य करण्यासाठी पाकड्यांकडून आणि दहशतवाद्यांकडून स्नायपर गनचा वापर करण्यात येत आहे. या स्नायपर गनचा सामना करण्यासाठी जवान सज्ज असल्याचे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले.

पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याने हिंदुस्थानी सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी ब्रिटनकडून 600 हलक्या वजनाच्या स्नायपर गन खरेदी केल्या आहेत. या गन एसएसजी आणि मुजाहिद्दीन बटालियनच्या शार्प शूटरला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी सुरक्षा दलासमोर स्नायपर गनचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सप्टेंबरपासून पाकड्याकडून आणि दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाला लक्ष्य करण्यासाठी स्नायपर गनचा वापर केल्याचे उघड झाले होते. आता मोठ्या संख्येने पाकिस्तानने स्नायपर गन विकत घेतल्याने सुरक्षा दलासमोरील आव्हान वाढले आहे. रेंजमास्टर आणि रेमिंग्टन प्रकारच्या वजनाने हलक्या गन पाकिस्नाने ब्रिटनकडून विकत घेतल्या आहेत. त्यांचे वजन फक्त 16 किलोग्रॅम असते. तसेच या गनची लांबी 48 इंच असते. ही गन फोल्ड करूनही शार्प शूटर फिरू शकतात. तसेच गनच्या टप्प्यात सुरक्षा दलाचे जवान आल्यावर त्यांना लक्ष्य करण्यात येते. त्यामुळे आता पाकिस्तानच्या कुरापती वाढण्याची शक्यता वर्तवत गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलाला सर्तकतेचा इशारा दिला आहे.

पाकिस्तानच्या कुरघोडी लक्षात घेता, सुरक्षा दलाने स्नायपर हल्ल्यांबाबत जवानांना सर्तकतेचा इशारा दिला असून काही सूचनाही केल्या आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी जवान तयार असल्याचे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले. सीमेपलीकडून आता सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यात येत आहे. सुरक्षा दलाने ऑपरेशन ऑल आउट राबवून दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळे आता जवानांना लक्ष्य करण्यात येत आहे. स्नायपर गनसोबतच पाकड्यांनी स्टीलच्या स्नायपर गोळ्याही खरेदी केल्या आहेत. आयएसआयने बोस्निया आणि बेल्जियमकडून एक लाख राऊंड स्नायपर गोळ्या खरेदी केल्या आहेत. या गोळ्या दहशतवाद्यांना आणि पाकिस्तान आर्मीला देण्यात येणार असल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. पाकव्याप्त कश्मीरमधील माछिल, उरी, तंगधार, पूंछ, बिंबरगली, रामपूर, कृष्णाघाटी आणि मेंढर या चौक्यांवर पाकिस्तानने स्नायपर तैनात केल्याचेही गुप्तचर विभागाकडून सांगण्यात आले.