शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारला हद्दपार करा : धनंजय मुंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । जिंतूर

केंद्र व राज्यात सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना आणि बेरोजगार युवकांना विविध प्रलोभने दाखवून विकासाची भाषा करणाऱ्या भाजप सरकारला साडेचार वर्षे झाली. मात्र, आजपर्यंत या सरकारला विकासाची व्याख्याच समजलेली नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. अच्छे दिन तर आलेच नाहीच शिवाय फसवी शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमी भावाची समस्या कायम आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्या हुकूमशाही सरकारने अनेक चांगल्या योजनांचा बट्याबोळ केला. आता भाजपला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत जनता मतदानातून भाजपला त्यांची जागा दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनाचा यात्रेदरम्यान बुधवारी ते जिंतूर येथे आयोजीत सभेत बोलत होते.

शहरातील जिल्हापरिषद मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बुधवारी निर्धार परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत ते म्हणाले की, या सरकारचा काळात दुर्दैवाने बोंडअळी आली होती. मात्र, ही बोंडअळी नसून मोदीअळी आहे. भाजप सरकारने किती पारदर्शक कारभार केला ते जनतेला आता कळून चुकले आहे. आता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी जनतेनी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यमंत्री फौजिया खान, आमदार बाबाजानी दुराणी, विक्रम काळे,विजय भांबळे, माजी मंत्री गणेशराव दुधगावकर आदी सभेला उपस्थीत होते. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिंतूर, सेलू मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.