
सामना प्रतिनिधी । मालवण
शहरातील मेढा येथील डॉ. कुडाळकर चाळ येथे राहणाऱ्या कृष्णाजी चव्हाण यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री माड कोसळल्याची घटना घडली. यात पाचजण किरकोळ जखमी झाले. तर घरातील संसारोपयोगी साहित्य व छप्पर यांचे सुमारे लाखांचे नुकसान झाले आहे.
मेढा येथील कृष्णाजी चव्हाण व त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्या घरात राहणारे भाडेकरु बुधवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना शेजाऱ्यांच्या कुंपणातील आंब्याचे झाड काही अंतरावर असलेल्या माडाच्या झाडावर कोसळले. त्यामुळे चव्हाण यांच्या घरावर माडाचे झाड कोसळले.
भाडेकरु असलेल्या अल्लाफ पटेल हुंचाळ यांच्यासह पत्नी यास्मिन, मुलगी जोया, मुलगा आईल व दुसऱ्या खोलीत झोपलेल्या चव्हाण यांचे नातेवाईक सारा सौदागर यांच्या अंगावर कोसळल्याने हे पाच जण जखमी झाले. मध्यरात्री झाड कोसळल्याची घटना समजताच बंड्या सरमळकर, भूषण परब व मेढा येथील नागरिकांनी धाव घेत पडलेले झाड बाजुला केले.
जखमी झालेल्या पाच जणांवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माड कोसळल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य, घराची कौले, छप्पर यांचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.































































