लेख : हिंदुस्थानची वाढती शस्त्रसज्जता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>ब्रिगेडियर हेमंत महाजन<<

[email protected]

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नेहमीप्रमाणे देशाच्या राजधानीत आपल्या तिन्ही संरक्षण दलांचे भव्य संचलन राजपथावर झाले. त्यात प्रदर्शित झालेल्या आधुनिक शस्त्रांमुळे देशवासीयांना पुन्हा एकदा आश्वासन मिळाले की, हिंदुस्थानी सैन्य देशाचे रक्षण करण्यास समर्थ आहे. बाह्य सुरक्षेची आव्हाने वाढत असल्याने हिंदुस्थानी लष्कर आणि सरकारने मोठा निर्णय घेऊन चालू वर्षात 10 महत्त्वाच्या शस्त्रप्रणाली हिंदुस्थानी सैन्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंदुस्थानची लढाऊ क्षमता मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे.

हिंदुस्थानी सैन्यदलात सामील होणाऱ्या ‘राफेल’ या लढाऊ विमानावरून वाद सुरू असला तरी तीं सैन्यात थोडय़ाच काळात दाखल होतील. वास्तविक सैन्यात हे विमान दाखल होण्यास खूप उशीर झाला आहे. कारण त्यावर निर्माण केलेली भ्रष्टाचाराची कहाणी, पण हे विमान या वर्षाच्या शेवटी हवाई दलात दाखल होणार आहे. 36 विमाने आणल्यामुळे हवाई दलाची लढाऊ क्षमता प्रचंड वाढणार आहे. राफेल विमानाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही विमाने अत्याधुनिक आहेतच, पण त्यात नवीनतम यंत्रे, आयुधे बसवलेली आहेत. त्यामुळे ते जगातील सर्वोत्तम विमान समजले जाते. ते आपल्याला चीनविरुद्ध लेह लडाख भागातसुद्धा वापरता येणार आहे. एक राफेल विमान सध्याच्या अत्याधुनिक सुखोई विमानापेक्षाही दुप्पट क्षमतेचे आहे. याला फिफ्थ जनरेशन विमान समजले जाते.

अग्नी -5

त्यापुढचे शस्त्र आहे ते म्हणजे अग्नी-5 क्षेपणास्त्र. पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त टप्पा असलेले हे क्षेपणास्त्र सैन्याच्या स्ट्रटेजिक फोर्सेस कमांडमध्ये दाखल करण्यात येणार आहे. याचे वजन 1.5 टन असून त्यावर अण्वस्त्रंही नेली जाऊ शकतात. हे क्षेपणास्त्र लष्करात दाखल झाल्यावर चीनची सगळी शहरे आपल्या क्षेपणास्त्रांच्या पल्ल्यात येतील आणि चीनविरुद्ध वापरण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे क्षेपणास्त्र आपल्याला मिळेल. यामध्ये असलेली इतर आयुधे अतिशय आधुनिक आहे. हे क्षेपणास्त्र थांबवणे चीनला जवळपास अशक्य आहे.

हिंदुस्थानची गुप्तहेर संस्था नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (एनटीआरओ)करिता शत्रूच्या क्षेपणास्त्रावर लक्ष ठेवण्याकरिता एक जहाज बांधण्यात येत आहे. 2014 मध्ये या कामास सुरुवात झाली होती. या वर्षी ते सैन्यदलात सामील झाले तर ते कौतुकास्पदच असेल. या जहाजामुळे समुद्रातून येणाऱ्या शत्रूच्या क्षेपणास्त्रावर आपल्याला लक्ष ठेवता येईल.

अरिहंत पाणबुडी

काही महिन्यांपूर्वी अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी ‘अरिहंत’ नौदलात तैनात झाली. तिने आपल्या किनारपट्टीजवळ गस्त घालून आपली क्षमता सिद्ध केली. 35 वर्षांनंतर अशा प्रकारची पाणबुडी तयार करण्यात आपल्याला यश आले आहे. आता त्याची दुसरी आवृत्ती आयएनएस अरिहंत तयार करण्यात येत आहे. आपल्याला चीन आणि पाकिस्तान दोन्ही देशांविरुद्ध अणुयुद्धाचा प्रसंग आल्यास सेकंड स्ट्राईकच्या क्षमतेकरिता अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी हा एक महत्त्वाचा पैलू आहे. अशा पाणबुडय़ांना पाण्याच्या आत शोधणे अतिशय कठीण असते. मात्र आपल्याला आयएनएस रिहानसारख्या अणुशक्तीवर चालणाऱ्या आणखी दोन-तीन पाणबुडय़ांची गरज आहे. याच वर्षी आयएनएस अरिहंत सैन्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे. काही वर्षांत इतर पाणबुडय़ाही सैन्यदलात प्रवेश करतील. त्यामुळे आपली सेकंड स्ट्राईक क्षमता वाढणार आहे.

कलवारी दर्जाच्या पारंपरिक पाणबुडय़ा

आपल्या नौदलाकडील पारंपरिक पाणबुडय़ा – त्यांची संख्या 25 हून अधिक असायला हवी – ती तेराहून कमी झालेली आहे. म्हणजेच आपल्याला नवीन पारंपरिक पाणबुडय़ांची गरज आहे. याकरिता दुसरी आणि तिसरी कलवारी दर्जाच्या पारंपरिक पाणबुडय़ा प्रोजेक्ट 375 साठी बनवण्यात येत आहेत. त्यांचा नौदलात या वर्षाअखेरीपर्यंत समावेश होण्याची शक्यता आहे.

अपाची आणि सीएच-47 एफ हेलिकॉप्टर

अपाची एएच 64 पी हेलिकॉप्टर मार्च शेवटपर्यंत हिंदुस्थानात येऊ शकेल. याचा वापर अमेरिका, युरोप यांनी सोमालिया, इराक, अफगाणिस्तान युद्धात केला आहे. त्यावर 30 मिलीमीटरची तोफ बसवली आहे. ती 1200 राऊंड फायर करू शकते. त्याशिवाय त्यावर 70 मिलीमीटर रॉकेट बसवली आहेत. अपाची रॉकेट आणि शेल फायर नावाचे क्षेपणास्त्रदेखील फायर करू शकते. हिंदुस्थानला रशियाचे
‘मी-8’ हेलिकॉप्टर चालवण्याची सवय आहे. आता अपाची हे ‘ऍटॅक’ हेलिकॉप्टर आल्यामुळे त्याचा वापर आपल्याला पारंपरिक युद्धात करता येईल. आणखी एक नवीन आयुध म्हणजे ‘सीएच-47 एफ’ हेलिकॉप्टर. त्याची वजन वाहण्याची क्षमता प्रचंड आहे. याला हाय अल्टिटय़ूड भागात वापरता येते. त्यामुळे तोफखान्याच्या तोफा हेलिकॉप्टरने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जायच्या असतील तर त्याचा वापर होऊ शकतो.

याशिवाय नवीन मल्टिरोल हेलिकॉप्टर नौदलासाठी विकत घेत आहोत. पुढील वर्षभरात ते नौदलात सामील होईल.

त्याशिवाय नवीन तयार झालेल्या एम 77 लाइटवेट आणि के 9 व्रज या दोन तोफा हिंदुस्थानी तोफखान्यात सामील होत आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी तोफखान्याची ताकद वाढणार आहे. 1988 सालामध्ये बोफोर्स तोफांनंतर तोफखान्यात नवीन तोफा हिंदुस्थानी सैन्यात सामील झाल्या नव्हत्या. आता या तोफा सैन्यात आल्या आहेत. या तोफा हिंदुस्थानी उत्पादकांनी मेक इन इंडियाअंतर्गत बनवल्या आहेत. लार्सन अँड टुब्रो आणि भारत फोर्जने या तोफा बनवल्या आहेत. त्यांचा दर्जा अत्युत्तम आहे.

सैन्याला जशी अत्याधुनिक शस्त्रांची गरज असते, त्याशिवाय आपल्याला पायाभूत सोयीसुविधा जसे रस्ते, रेल्वेलाइन, विमानतळ यांचीही गरज असते. तशीच गरज पूर्ण करणारा एक पूल बोगिविल हा पूल ब्रह्मपुत्रेवर ईशान्य हिंदुस्थानात तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणेकडे तैनात असलेल्या सैन्याला उत्तरेला हिंदुस्थान-चीन सीमेवर जाऊन वेगाने पोहोचता येईल. चीनशी मुकाबला करण्यासाठी क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला अजून जास्त पायाभूत सुविधा ईशान्य हिंदुस्थान आणि लडाखच्या भागात तयार कराव्या लागतील. आता ईशान्य हिंदुस्थानमध्ये रस्ते निर्माणाचा वेगही वाढला आहे. ज्या रस्ते रेल्वेलाइन आणि विमानतळांचे  काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते ते आता झपाटय़ाने पूर्ण होत आहे. हिंदी महासागरात चीनचा प्रभाव वाढत असताना हिंदुस्थानने अंदमान-निकोबार द्वीपसमूहांवर पुढील 10 वर्षांमध्ये 5,650 कोटी रुपये खर्चाच्या लष्करी पायाभूत विकास योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर या क्षेत्रात हिंदुस्थानकडून अतिरिक्त युद्धनौका, विमाने, ड्रोन, मिसाईल बॅटरी आणि पायदळ तैनात केले जाणार आहेत.

पोर्ट ब्लेअर आणि कार निकोबारमधील दोन मुख्य विमानतळ वाढवण्यात येणार आहेत. तसेच उत्तरेकडील शिबपूरमध्ये नौदलाच्या हवाई ठाण्यांवरील धावपट्टय़ाही वाढवण्यात येणार आहेत. तसेच मोठय़ा विमानांच्या संचलनात मदत व्हावी म्हणून दक्षिणेत कॅम्पबेल बे 10 हजार फुटांपर्यंत वाढवला जाणार आहे. कामोर्टा द्वीपवर 10, हजार फुटांची आणखी एक धावपट्टी निर्माण करण्याची योजना आहे.