
सामना प्रतिनिधी । कुंडलवाडी
कुंडलवाडी येथून जवळच असलेल्या बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात बी.ए.प्रथम वर्षात शिकत असलेल्या विजय राजू पोतनकर (२४) या विद्यार्थ्यावर चार जणांनी चाकूने हल्ला केल्याची घटना दि.२ फेब्रुवारी रोजी ४ च्या सुमारास घडली. घटनेनंतर पोलीस स्टेशनजवळ मोठा जमाव एकत्रित झाला होता.
पानसरे महाविद्यालय, अर्जापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन असून त्याचा आज २ फेब्रुवारी तिसरा दिवस होता. स्नेहसंमेलनात कार्यक्रम सुरू असताना अचानक चार विद्यार्थ्यांनी बी.ए.प्रथम वर्षाचा विद्यार्थी विजय राजू पोतनकर याच्या उजव्या बाजूस कमरेखालच्या भागावर चाकुने हल्ला केला. यात विजय पोतनकर हा गंभीर जखमी झाला असून त्यास बिलोली येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करून पुढील उपचारार्थ नांदेडला हलविले आहे.
घटनेची माहिती समजताच तात्काळ कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे व सहकारी दाखल झाले. घटना घडताच आरोपी विद्यार्थी पसार झाले असून एका संशयित आरोपी विद्यार्थ्यांस ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.
































































