
सामना प्रतिनिधी। जळगाव
मतदानाचा विचार न करता नागरिकांच्या समस्येला प्राधान्य देत केवळ दिडशे व अडीचशे लोकवस्तीच्या गावांसाठी शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री तथा उपनेते गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांसाठी मंजुरी मिळवली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील तीर्थक्षेत्र भोकर -पळसोद ते रामेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्यासह 4 गावांच्या रस्ते मजबूतीकरणासाठी 7 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच निमगाव व तिघरे येथे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळे डांबरी रस्ते होणार आहेत. जळगाव ग्रामीण मतदार संघात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्या मुळे जळगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र पळसोद रामेश्वर मंदिर पर्यंतच्या रस्त्यांचा कायापालट होणार आहे. यासाठी शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून सुमारे 7 कोटींचा निधी मंजूर झाला असून सदर कामांसाठी प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे.
जळगाव तालुक्यात 7 कोटींचा निधी
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जळगाव तालुक्यात रा.मा.क्र.६ ते तिघरे 1.17 कि. मी. साठी 78 लक्ष , प्रजीमा 07 ते निमगाव रस्ता 1.05 कीमी साठी 1 कोटी 23 लक्ष , रा.मा.40 – आव्हाणे रस्त्याच्या 2 किमीसाठी 1 कोटी 63 लक्ष, भोकर ते पळसोद तीर्थक्षेत्र रामेश्वर 3 की.मी. च्या रस्त्यासाठी 3 कोटी 4 लक्ष अश्या 4 रस्त्याच्या 7.50 की. मी. रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण साठी (पुल / मोऱ्यांच्या कामासह) तसेच देखभाल दुरुस्तीसाठी 33 लक्ष असे एकूण सुमारे 7 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.तर देखभाल दुरूस्ती साठी 33 लाख मंजूर करण्यात आले. रस्ते मंजुरी साठी सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी सतत पाठपुरावा केला होता. या रस्त्यांच्या कामांमुळे 10-12 गाव बारमाही दळण-वळणा साठी जोडली जातील. विशेषतः शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठीही फायदा होणार असल्याने तसेच हायवे न.6 ते तिघरे व निमगाव तसेच पळसोद-रामेश्वर या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. रस्ता मंजुरीमुळे भाविकांनी तसेच त्या-त्या परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.































































