
सामना प्रतिनिधी । अँटिग्वा
इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका आधीच 2-0 फरकाने खिशात टाकल्यानंतर वेस्ट इंडीज संघाला मोठा धक्का बसला. त्यांचा कर्णधार जेसन होल्डरवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. दुसर्या कसोटीत मंदगतीने षटके टाकल्याबद्दल त्याच्यावर ‘आयसीसी’ने ही कारवाई केली.
‘आयसीसी’च्या बंदीच्या निर्णयामुळे होल्डरला इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटीत खेळता येणार नाही. त्याच्या जागेवर क्रॅग ब्रॅथवेट तिसर्या कसोटीत विंडीज संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नने होल्डरवरील बंदीच्या निर्णयाबद्दल ‘आयसीसी’वर टीका केली. जो कसोटी सामना तीन दिवसांत संपला त्यात मंदगतीने षटके टाकण्याचा मुद्दा येतोच कसा, असा सवालही त्याने ट्विटरवर केला.




























































