खोदलेले रस्ते पूर्ववत केल्याशिवाय मेट्रोच्या कंत्राटदारांना बिले देऊ नका, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत मेट्रोच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदले आहेत. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने खादलेले रस्ते पूर्ववत केल्याशिवाय त्यांना बिले देऊ नका अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच वर्सोवा-अंधेरीदरम्यानच्या मेट्रो मार्गाच्या कामानंतर आजही रस्ते समतल केले नसल्याने परिसरात वाहतूककोंडी होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

सध्या मुंबईतील मेट्रोच्या कामांची व्याप्ती पाहता महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएमआरडीएने तयार केलेले रस्ते अनेक ठिकाणी खोदलेले आहेत. वर्षभरापासून सुरू असलेल्या या कामांमुळे रस्ता खोदलेल्या ठिकाणी पाणी मुरल्याने रस्त्यांची आणि फुटपाथची पुरती दुर्दशा झाली आहे. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेल्या रस्ते योग्यरितीने पूर्ववत न केल्यास मोठी वाहतूककोंडी होऊन अपघात वाढू शकतात. त्याची गंभीर दखल घेत आमदार सुनील प्रभू यांनी रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतरच बिले द्यावीत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच रस्ते पूर्ववत केल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून संयुक्त तपासणी केल्यानंतरच त्यांची देय रक्कम द्यावी असेही स्पष्ट केले आहे. रस्ते दुरुस्त न केल्यास अपघात वाढण्याची भीतीही प्रभू यांनी व्यक्त केली आहे.