संघ सर्वाधिक धर्मनिरपेक्ष, राज्यपालांनी केली स्तुती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
c-vidyasagar-rao

सामना प्रतिनिधी । नागपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेश संघटना आहे. संघाने नेहमी प्रत्येकाच्या श्रद्धेचा मान ठेवलेला आहे, अशा शब्दांत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी संघाची स्तुती केली.

रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी गुरुकुलाचा शुभारंभ तसेच नवीन शैक्षणिक भवनाचे लोकार्पण विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले तसेच गोळवलकर गुरुजींच्या प्रतिमेचे अनावरण व शारदापीठाचे शिलान्यास अनावरण राज्यपालांच्या हस्ते झाले. संघस्थानाचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन या वेळी राज्यपालांनी केले. संघस्थानावरून आपण आलो आहोत व ते आपण अभिमानाने सांगतो, असेही ते म्हणाले.या वेळी पेजावर मठाधिपती श्रीविश्वेशतीर्थ श्रीपाद, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्कृतला जागतिक स्तरावर मान्यता मिळत असून जर्मन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी प्रमुख विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषेचे अध्ययन होत आहे. आपल्या विद्यापीठाने जगातील विद्यापीठांसोबत समन्वय साधून संस्कृत अध्ययनासोबत संशोधनाला प्रोत्साहन देत एक प्रमुख अध्ययन केंद्र म्हणून विकसित करावे, असे राज्यपाल म्हणाले.