
सामना प्रतिनिधी । मुंबई
चॅनेल निवडीचे स्वातंत्र्य मिळणार. आपल्याला हवे ते चॅनेल्सच घेता येणार. हव्या त्या चॅनेल्ससाठी तितकेच पैसे मोजावे लागतील. उगाच भारमभार चॅनेल्स नकोतच असे जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा… कारण, ट्रायच्या नव्या नियमांनुसार प्रत्यक्षात केबल महागणार आहे. एचडी चॅनेल्स हवे असतील तर फ्री टू एयर आणि मनोरंजन पॅकसाठी 600 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यातही नको ते चॅनेल्सच गळय़ात पडणार आहेत. अशाप्रकारे केबल महागणार असून केबलपेक्षा मोबाईलवरच्या वेबसीरिज बऱया अशी भावना प्रत्येक ग्राहक व्यक्त करताना दिसणार आहे. केबलचे बिल भरण्यापेक्षा प्रत्येकजण वेबचॅनेल्सचे सबस्क्रिप्शन घेण्यातच धन्यता मानणार आहे.
ब्रॉडकास्टर्स ग्राहकांपुढे मनोरंजन वाहिन्यांचा बुकेच घेण्याचा पर्याय ठेवतील. जेव्हा संपूर्ण कुटुंब मनोरंजन वाहिन्या बघते तेव्हा साहजिकच उत्तम चॅनेल्सचा पर्याय हवा. त्यामुळे त्यांच्याकडेही बुके घेण्याशिवाय मार्ग नसेल. पण, या बुकेमध्ये जे चॅनेल्स पाहायचे नसतील तेदेखील ग्राहकांच्या गळय़ात पडतील. परिणामी, हा बुकेच ग्राहकांना महागात पडणार आहे.
केबल ऑपरेटर्स उद्ध्वत होणार
ब्रॉडकास्टना चॅनेल्स विकण्याची परवानगी दिल्यामुळे तब्बल 80 टक्के नफा बॉडकास्टना मिळेल, तर केबल ऑपरेटर्सना केवळ 10 टक्के इतकाच नफा मिळेल. इतक्या कमी नफ्यावर व्यवसाय करावा लागणार असल्यामुळे केबल ऑपरेटर्स उद्ध्वस्त होणार आहे. सरकारने ब्रॉडकास्टचा फायदा करून देण्यासाठीच नवे नियम आणले आहेत.
– अनिल परब , अध्यक्ष, शिवसेनाप्रणीत केबल ऑपरेटर्स ऍण्ड ब्रॉडकास्ट असोसिएशन
चॅनेल्सच्या बुकेचे गणित
– 130 रुपये आणि जीसटी तसेच अतिरिक्त 25 चॅनेल्स घ्यायचे झाल्यास 20 रुपये आणि जीएसटी आकारला जाईल.
– ‘सोनी’सारख्या मनोरंजनात्मक चार मोठ्या कंपन्यांचे बुके घ्यायचे असतील तर किमान 200 ते 300 रुपये मोजावे लागतील.
एकूण खर्च
– 130+20+200 +18 टक्के जीएसटी म्हणजेच हा खर्च 413 रुपयांवर जाईल
– एचडी चॅनेल्ससाठी हा खर्च 500 ते 600 रुपयांवर जाईल.
केबल ऑपरेटर्स काय देत होते?
– केबल ऑपरेटर्स 350 रुपयांमध्ये तब्बल 550 चॅनेल्स दाखवायचे. त्यामुळे ग्राहकांना परवडत होते.
– हवे ते चॅनेल्स मिळत होते. एचडी चॅनेल्सही मिळायचे. उलट मनोरंजनाचा डबल धमाका असायचा.
ब्रॉडकास्टर्स काय देणार?
– 350 रुपयांमध्ये 125 ते 150 चॅनेल्सच मिळणार आहेत.
– पहिले 100 चॅनेल्स न बघण्यासारखेच असतील. केवळ वरचे 50 चॅनेल्स पाहण्याजोगे असतील.
ट्रायचा हा नवा नियम नेमका कुणाच्या फायद्याचा, असा सवाल ग्राहक विचारताना दिसणार आहेत.
– स्टारच्या 12 चॅनेल्ससाठी 49 रुपये आकारण्यात येणार आहेत. मात्र, यातले केवळ स्टार स्पोर्टस् आणि स्टार टीव्ही हे दोनच चॅनेल्स सर्वाधिक पाहिले जातात. त्यामुळे उरलेले 10 चॅनेल्सही उगाचच घ्यावे लागणार आहेत.






























































