
सामना प्रतिनिधी । कुडाळ
मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना कुडाळ – साळगाव येथे अनधिकृत माती उत्खनन केल्याचा ठपका ठेवून महामार्गाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीला सुमारे दहा कोटीचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची एकूण रक्कम 10 कोटी 36 लाख 64 हजार 400 रुपये आहे. ती रक्कम 7 दिवसात भरण्यात यावी असे आदेश तहसिलदारांनी कंपनीला दिले आहेत.
याबाबत 19 ऑक्टोंबर 2018 रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्यांकडे अनुपम कांबळी यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार जिल्हाधिकार्यांनी कुडाळ तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार मे. दिलीप बिल्डकॉन प्रा.लि.कंपनीकडून साळगाव येथे अधिकृत उत्खनन परवानगी न घेता ब्रास मातीचे अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी तलाठी साळगाव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 48/7 अनुसार 5 पट दंडात्मक कारवाई करण्याबाबत अहवाल सादर केला. त्यानुसार कुडाळ तहसीलदार यांनी दिलीप बिल्डकॉन या कंपनीने संबंधित जमीन मालकासोबत करार केलेला आहे व महामार्गासाठी लागणार्या माती व गौणखनिजाचे एकत्रित स्वामित्वधन व इतर शासकीय रक्कमा शासन जमा करण्याचे आदेश पारित करण्याची कारवाई चालू असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकार्यांनी कळविले आहे. त्यामुळे ब्रास मातीचे अनधिकृत उत्खनन झाले असून तसा अहवाल मंडल अधिकारी यांनी कुडाळ तहसीलदारांना सादर केला. त्यानुसार कुडाळ तहसीलदारांनी दिलीप बिल्डकॉनला 10 कोटी 36 लाख 64 हजार 400 रुपयाचा दंड ठोठावल्याचे आदेश 23 जानेवारी 2019 रोजी दिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात पहिल्यांदाच दिलीप बिल्डकॉनला 10 कोटीचा झटका बसला आहे.































































