
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपनेच केलेल्या एका सर्वेक्षणात उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहित अनेक राज्यांतील भाजपच्या जागा घटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तीन राज्यांपाठोपाठ केंद्रातील सत्तेतूनही बाहेर फेकले जाण्याच्या भीतीने भाजप नेते चिंतेत पडले आहेत. मागील निवडणुकीत 80 पैकी 71 जागा जिंकलेल्या उत्तर प्रदेशात भाजपला यावेळी 15 ते 20 जागाच मिळतील. 55 ते 60 जागा गमवाव्या लागतील असा पक्षाच्या सर्वेक्षणातील अंदाज आहे. त्यामुळे भाजपने तिथे नव्या मित्र पक्षांचा शोध सुरू केला आहे.
भाजपच्या सर्वेक्षणानुसार पक्षाची स्थिती मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, बिहार, झारखंड, उत्तराखंड, हरयाणा, हिमाचल प्रदेश या दहा राज्यांत मजबूत आहे. मात्र त्या राज्यांतही भाजपला काही जागा गमवाव्या लागणार आहेत. त्यामुळे संख्याबळाचा पडणारा ‘खड्डा’ भरून कसा काढायचा हा प्रश्न भाजप नेत्यांना सतावतो आहे.
अजित सिंगांकडे नजर
उत्तर प्रदेशात ‘अपना दल’ आणि ‘सुहेलदेव समाज पार्टी’ हे दोन पक्ष एनडीएमध्ये भाजपचे मित्र पक्ष आहेत. पण या दोन्ही पक्षांचे प्रभाव क्षेत्र हे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातच आहे. त्यातच काँग्रेसने पूर्व भागाचीच जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे दोन मित्र पक्षांची साथ असली तरी पूर्व भागातही भाजपला निश्चिंत राहण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. त्यामुळे भाजपने उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात नव्या मित्र पक्षाचा शोध सुरू केला. भाजप नेत्यांची नजर आशेने अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोक दलाकडे खिळली आहे.
पश्चिम भागात ‘रालोद’चा जाट मतदारांवर चांगला प्रभाव आहे. अजित सिंग आणि त्यांचे पुत्र जयंत चौधरी यांनी अलीकडेच ममता बॅनर्जी यांच्या मोदी सरकारविरोधी रॅलीत भाग घेतला होता. मात्र सपा-बसपा आघाडीत ‘रालोद’ला जादा जागा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अजित सिंग यांना जादा जागा देऊन भाजपकडे खेचण्याबाबत भाजप नेते आशावादी आहेत.
महाराष्ट्रातही फटका बसणार
भाजप अध्यक्ष अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वेळी जिंकलेल्या 42 जागांसहित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची बारामतीची 43वी आम्ही जागाही जिंकू असे पुण्यामध्ये शनिवारी एकसुरात सांगितले. पण प्रत्यक्षात मात्र भाजपला उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही मोठा फटका बसेल असा अंदाज पक्षाच्याच सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय मागील लोकसभा निवडणुकीत 42 जागा जिंकण्यात युतीला आलेल्या यशात शिवसेनेचा वाटा मोठा होता. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपचे यशापयश शिवसेनेवर अवलंबून राहणार आहे.
सपा-बसपा आघाडी आणि प्रियंकांमुळे चिंता वाढली
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव यांनी समाजवादी पार्टी- बहुजन समाज पार्टी यांच्या केलेल्या ‘आघाडी’मुळे आपला सफाया होण्याची भीती भाजपला वाटत आहे. त्यातच प्रियंका गांधी यांनी राजकारणात उडी घेऊन उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी शिरावर घेतली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या चिंतेत भरच पडली आहे.



























































